मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2025 15:08 IST2025-03-12T15:07:45+5:302025-03-12T15:08:06+5:30

Krishna Andhale Spotted in Nashik: आरोपी आंधळे हा आपल्या एका मित्रासह आज सकाळी नाशिकमध्ये बाईकवरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला आहे.

Big news santosh deshmukh murder accused Krishna Andhale is in Nashik Claims of being seen on a bike police start search | मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

मोठी बातमी: कृष्णा आंधळे नाशिकमध्येच? बाईकवर दिसल्याचा दावा, पोलिसांकडून शोध सुरू

Santosh Deshmukh Murder Case:बीडमधील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्या प्रकरणाला तीन महिने उलटून गेल्यानंतरही अद्याप या गुन्ह्यातील कृष्णा आंधळे (Krishna Andhale) हा आरोपी फरार आहे. कृष्णा आंधळेच्या हत्येची शक्यता वर्तवली जात असताना आता नवी माहिती समोर आली आहे. आरोपी आंधळे हा आपल्या एका मित्रासह आज सकाळी नाशिकमध्ये (Nashik) बाईकवरून फिरत असल्याचा दावा करण्यात आला असून पोलिसांकडे याबाबतची तक्रार करण्यात आली आहे. या दाव्याची दखल घेत पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आज सकाळी ९ वाजून ३६ मिनिटांच्या सुमारास नाशिक शहरातील गंगापूर रोडवरील सहदेव नगर येथील दत्त मंदिराजवळ कृष्णा आंधळेसारखा दिसणारा एक तरुण आपल्या मित्रासह बाईकवरून फिरत असल्याची तक्रार पोलिसांकडे करण्यात आली आहे. त्यानंतर पोलिसांनी या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज प्राप्त केले असून सीसीटीव्हीमध्येही दोन संशयित तरुण फिरताना दिसत आहेत. पोलिसांकडून आता या तरुणांचा शोध सुरू करण्यात आल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.

दरम्यान, सीसीटीव्हीमध्ये बाईकचा नंबर दिसत नसला तरी प्रत्यक्षदर्शींकडून करण्यात आलेल्या वर्णनानुसार आम्ही सदर संशयितांचा शोध घेत असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

देशमुख हत्या प्रकरण आणि कृष्णा आंधळे

संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करून त्यांचा खून करणाऱ्या आरोपींमध्ये कृष्णा आंधळे याचाही समावेश होता. याच आंधळेने देशमुखांना मारहाण करत असताना मोकारपंती या व्हॉट्सअॅप ग्रुपवर व्हिडिओ कॉल करून ग्रुपवरील सदस्यांना संतोष देशमुख यांना केलेली मारहाण दाखवली होती. सीआयडीने कोर्टात दाखल केलेल्या आरोपपत्रात याबाबतचा उल्लेख केला आहे. या ग्रुपमधील सहा जणांनी हा कॉल उचलला होता, असे समजते. सीआयडीने त्यांचेही जबाब घेतले आहेत.

दरम्यान, आरोपी कृष्णा आंधळे याने त्याच्या मोबाईलमधून या ग्रुपवर हे कॉल केले होते. त्यातील एका कॉलमध्ये कृष्णा आंधळे हा जखमांनी रक्तबंबाळ झालेल्या संतोष देशमुखांचा चेहरा व्हिडीओ कॉलवरून ग्रुपमधील इतरांना दाखवत आहे. त्यानंतर कृष्णा आंधळे ग्रुपमधील इतरांना म्हणतो की, 'हाच तो मस्साजोगचा सरपंच आहे. त्या दिवशी सुदर्शन भय्याला आणि आपल्या पोरांना आडवा आला होता.' त्यानंतर कृष्णा आंधळे तीन वेळा मोबाईलचा कॅमेरा संतोष देशमुखांच्या चेहऱ्याजवळ नेतो. त्यात देशमुखांच्या चेहऱ्यावरील जखमांमधून रक्त येताना दिसत आहे. 

Web Title: Big news santosh deshmukh murder accused Krishna Andhale is in Nashik Claims of being seen on a bike police start search

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.