भालूरच्या जवानाने घेतला जलसेवेचा ‘वसा’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2018 17:31 IST2018-12-14T17:29:11+5:302018-12-14T17:31:25+5:30
भालूर परिसरात गंभीर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली असून पिण्याच्या पाण्याची टंचाई निर्माण झाली आहे. या टंचाईवर काही प्रमाणात मात करण्यासाठी येथील सैन्यातील जवानाने आपल्या शेतातील बोअरवेलचे पाणी गावासाठी खुले करून देशसेवेबरोबरच जलसेवेचाही वसा घेतला आहे.

भालूरच्या जवानाने घेतला जलसेवेचा ‘वसा’!
सध्या सर्वत्र दुष्काळी परिस्थीती निर्माण झाली असून तालुक्याच्या दक्षिणभागात आतापासूनच विहिरींनी तळ गाठला आहे. नागरिकांना पाणीटंचाई मुळे पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. येथील सैन्यदलात कार्यरत असलेले जवान विलास चंद्रकांत मडके हे सध्या गावी आले असता पाणीटंचाईच्या झळा त्यांनी जवळून पाहिल्या. शेतातील पिकांना जीवदान देण्यासाठी त्यांनी गावालगत आपल्या शेतात बोअरवेल करण्याचा निर्णय घेतला. सुदैवाने ऐन दुष्काळातही या बोअरवेलला चांगले पाणी लागले. त्यामुळे सध्याची टंचाई परिस्थिती लक्षात घेता या जवानाने बोअरवेलचे पाणी गावातील लोकांना मोफत उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला. ग्रामपंचायतीने तत्काळ चार हजार लिटर पाण्याची टाकी बोअरवेलजवळ बसवून नळाची व्यवस्था करून दिली आहे. यामुळे परिसरातील लोकांचा पाण्याचा प्रश्न काही अंशी मार्गी लागला आहे. त्यांच्या या कार्यामुळे देशसेवेबरोबर जनसेवा घडत असल्याने समाधान व्यक्त करण्यात आले. जवान विलास मडके यांच्या हस्ते सपत्नीक पूजन करून श्रीफळ वाढविण्यात आले. यावेळी सरपंच संदीप आहेर, दिगंबर निकम,संजय निकम, विलास आहेर, बाबासाहेब आहेर, चंद्रकांत मडके,अशोक निकम, सुदाम मडके,सुरेश मडके,सुनील पवार,गोरख बागुल आदी उपस्थित होते.