Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 13:11 IST2025-12-21T13:09:56+5:302025-12-21T13:11:25+5:30
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: भगूरमध्ये मतदारांनी शिवसेनेला मोठा धक्का देत अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसवर विश्वास दाखवत सत्ताबदल केला.

Bhagur Nagar Parishad Election Result 2025: २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता गेली, भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय; ‘अशी’ झाली लढत!
Bhagur Nagar Parishad Election Result 2025: राज्यातील २४६ नगरपरिषदा व ४२ नगरपंचायतींच्या एकूण २८८ सदस्यपदासाठी आणि थेट अध्यक्षपदाच्या सार्वत्रिक निवडणुकांकरिता मतदान झाले. आता २१ डिसेंबर २०२५ रोजी निकाल आहे. या सर्व निवडणुकीत पुन्हा एकदा महायुतीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. यातच नाशिकमधील भगूर नगर परिषद निवडणुकीत मोठा उलटफेर पाहायला मिळाला. तब्बल २७ वर्षांची शिवसेनेची सत्ता संपुष्टात आली असून, अजित पवारांच्याराष्ट्रवादी काँग्रेसने मोठा विजय मिळवला आहे.
नाशिकचे भगूर म्हणजे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे गाव म्हणून परिचित आहे. या ठिकाणी करंजकर आणि बलकवडे अशी परंपरागत राजकीय लढाई होती. गेले २७ वर्षे या गावात विजय करंजकर आणि शिवसेनेची सत्ता हेाती. गेल्या लोकसभा निवडणुकीत तिकीट नाकारल्याने करंजकर उद्धव ठाकरेंना सोडून शिवसेना शिंदे गटात गेले. दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन गट पडले आणि प्रेरणा बलकवडे या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्या. देवळाली मतदार संघात हे गाव येते. पण हा मतदारसंघ राखीव असल्याने प्रेरणा बलकवडे यांना आमदारकी लढता आली नाही. त्यामुळे नगर परिषदेत करंजकर आणि बलकवडे यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली.
भगूरमध्ये अजित पवार गटाचा मोठा विजय
करंजकर आणि बलकवडे यांच्या परंपरागत लढाईत बलकवडे यांचा विजय झाला आहे. अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांना ५ हजार ४०७ मते मिळाली, तर अनिता करंजकर यांना ३ हजार ४९४ मते मिळाली. मतमोजणीला सुरुवात होताच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आघाडी घेतली. पहिल्या काही फेऱ्यांमध्येच राष्ट्रवादीच्या उमेदवारांनी आघाडी घेत विजय निश्चित केला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रेरणा बलकवडे यांनी विजय मिळवला असून, त्यांना भाजपचा पाठिंबा आहे. भगूर नगरपरिषदेत गेल्या २७ वर्षांपासून शिवसेनेची सत्ता होती. मात्र यंदाच्या निवडणुकीत मतदारांनी स्पष्ट कौल देत सत्ताबदल घडवून आणला.
दरम्यान, गेल्या विधानसभा निवडणूकीत महायुतीकडून आमदार सरोज आहिरे यांना उमेदवारी दिली. तेव्हा स्वेच्छा निवृत्ती घेतलेल्या माजी तहसलीदार राजश्री अहिरराव यांना शिंदेसेनेने एबी फॉर्म दिला, तो खास हेलीकॉप्टरमधून आणण्यात आला. त्यावेळी याच करंजकर आणि शिंदेसेनेचे माजी खासदार हेमंत गेाडसे यांनी अहिरराव यांना पुढे करून आमदारकीत अडथळे आणले. त्यामुळे सरोज अहिरे यांनी प्रेरणा यांना नगराध्यक्ष निवडणून आणण्यासाठी प्रचंड प्रयत्न केले. निवडणूकीतील आरोप प्रत्यारोपाने त्यांनी ही निवडणूक प्रतिष्ठेची केली. अखेरीस त्याला यश आले.