शिक्षक संघटनांचे आंदोलन मागे

By Admin | Updated: December 31, 2016 23:24 IST2016-12-31T23:23:56+5:302016-12-31T23:24:18+5:30

मागण्यांवर शिक्षणाधिकाऱ्यांची चर्चा

Behind the movement of teachers' organizations | शिक्षक संघटनांचे आंदोलन मागे

शिक्षक संघटनांचे आंदोलन मागे

नाशिक : जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांच्या प्रलंबित प्रश्नांबाबत गेल्या अनेक दिवसांपासून निर्णय होत नसल्याने दोन दिवसांपासून सुरू असलेले प्राथमिक शिक्षकांचे धरणे आंदोलन शनिवारी (दि.३१) आश्वासनानंतर मागे घेण्यात आले. प्राथमिक शिक्षणाधिकारी प्रवीण अहिरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर आंदोलन मागे घेण्यात आल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे.
शिक्षकांच्या जिल्हा परिषद स्तरावरील प्रश्नांबाबत अनेक वेळा प्राथमिक शिक्षणाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी यांची भेट घेऊन चर्चा करण्यात आली आहे. निवेदने देण्यात आली. मात्र कुठल्याच प्रश्नांवर ठोस कार्यवाही होत नसल्याने हे धरणे आंदोलन सुरू करण्यात आले होते. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती, पदवीधर शिक्षक संघटना, शिक्षक सेना, आदिवासी संघटना, समता शिक्षक परिषद, मागासवर्गीय शिक्षक संघटना, केंद्रप्रमुख संघ आदि संघटनांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शिक्षकांचे वेतन आॅनलाइन राष्ट्रीयीकृत बॅँकेत ५ तारखेच्या आत करावे, डी.सी.पी.एस. कपातीचा हिशेब संबंधित शिक्षकांना देण्यात यावा, पदवीधर शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्र प्रमुख पदोन्नतीची कार्यवाही करावी, वरिष्ठ वेतनश्रेणी व निवडश्रेणीचे प्रस्ताव निकाली काढावेत, वैद्यकीय देयके इतर फरक देयकांसाठी पंचायत समितीला निधी मंजूर करावा, प्रलंबित बी.एड. परवानगी व रजा प्रकरणे मंजूर करावीत, सहावा वेतन आयोगातील फरकाचे उर्वरित हप्ते फंडात जमा करणे, प्रलंबित प्रश्नांच्या कार्यवाहीसाठी दर दोन महिन्यात शिक्षक संघटनांची बैठक बोलवावी यासह अन्य मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले. या आंदोेलनात विठ्ठल धनाईत, पांडुरंग कर्डिले, दादाजी सावंत, केदू देशमाने, आनंदा कांदळकर, महारू निकम, राजेंद्र दिघे, केदराज कापडणीस, अंबादास अहिरे, एस. के. चौधरी, अर्जुन भोये, उत्तम केदारे, राहुल सोनवणे यांच्यासह शिक्षक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. (प्रतिनिधी)










 

Web Title: Behind the movement of teachers' organizations