नवविवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2018 00:13 IST2018-04-29T00:13:08+5:302018-04-29T00:13:08+5:30
मोबाइलवर कुठल्या मुलीशी चॅटिंग करतात, असे विचारल्याचा राग आल्याने दोन महिन्यांपूर्वी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नवविवाहितेला ठार मारण्याचा प्रयत्न
नाशिकरोड : मोबाइलवर कुठल्या मुलीशी चॅटिंग करतात, असे विचारल्याचा राग आल्याने दोन महिन्यांपूर्वी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून देत जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी पती, सासू व नणंदविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. देवळालीगाव पाटील गॅरेज जवळील चंदनवाडी येथील विवाहिता ज्योती दीपक साठे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, गेल्या २५ फेब्रुवारी रोजी रात्री १०.३० वाजता माझे पती हे मोबाइलवरून मोरे आडनाव असलेल्या मुलीसोबत चॅटिंग करीत होते. नेहमी ते चॅटिंग करत असल्याने तुम्ही कोणाला व का एसएमएस करतात असे विचारल्याचा राग आल्याने पती दीपक साठे याने डोक्याचे केस पकडून छातीवर मारहाण केली. त्यानंतर प्लॅस्टिकच्या बाटलीमधून अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिले. यावेळी सासू मुक्ताबाई यांनी मला पकडून ठेवले तर नणंद राणी हिने घराच्या दरवाजाची आतून कडी लावून घेतली. पेटवून दिल्याने मी आरडाओरड केल्याने आजूबाजूचे नागरिक जमा झाले. त्यानंतर जखमी अवस्थेत पती दीपक व सासू यांनी मला रिक्षातून बिटको रुग्णालयात उपचाराकरिता दाखल केले. यावेळी पती व सासूने आमच्या विरोधात तक्रार केली तर तुझ्या दोन्ही मुलींना मारून टाकू, असा दम दिला. त्यामुळे पोलीस व कार्यकारी दंडाधिकारी यांना मी खोटा जबाब दिला. खासगी रुग्णालयात उपचार करून माहेरी गेल्यानंतर विवाहिता ज्योतीने खरा प्रकार आई व भावाला सांगितला. याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात पती, सासू व नणंद यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.