भररस्त्यात स्कूटीवरून पाठलाग करत वार; विद्यार्थिनींना उडवले अन् स्कूल व्हॅनला धडकले, नाशकात तरुणांचा हैदोस
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 14, 2025 14:08 IST2025-10-14T14:07:49+5:302025-10-14T14:08:31+5:30
नाशिकच्या पंचवटीतील गजानन चौकात तरुणावर गुडांनी वार करुन पळ काढल्याची घटना घडली.

भररस्त्यात स्कूटीवरून पाठलाग करत वार; विद्यार्थिनींना उडवले अन् स्कूल व्हॅनला धडकले, नाशकात तरुणांचा हैदोस
Nashik Crime: नाशिकमध्ये गेल्या काही दिवसांपासून गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ झाली असून गुन्हेगारी टोळ्यांनीही डोकं वर काढण्यास सुरुवात केली आहे. तरुणांसह अल्पवयीन मुलं देखील गुन्हेगारीकडे वळाली असून अनेक धक्कादायक घटना समोर येत आहेत. अशातच नाशिकच्या पंचवटी भागात भरदिवसा एका युवकावर धारदार शस्त्राने हल्ला करण्यात आला. रस्त्यात घडलेल्या या घटनेमुळे काही वेळ भीतीचे वातावरण निर्माण झालं होतं. मात्र काही नागरिकांनी हल्लेखोरांना हटकल्यामुळे मोठा अनर्थ टळला. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.
पंचवटी येथील गजानन चौकात सोमवारी अडीच वाजण्याच्या सुमारास काही तरी वादातून दोघे तरुण नंबर नसलेल्या स्कूटीने एका युवकाचा पाठलाग करत आले. यावेळी त्यांनी धोकादायक पद्धतीने स्कूटी चालवत पादचारी विद्यार्थिनींना धडक दिली. त्यानंतर त्या युवकावर शस्त्राने सपासप वार करत तेथून पळण्याच्या प्रयत्नात स्कूल बसला धडक दिली अन् सुसाट धूम ठोकली. भरदिवसा वर्दळीच्या परिसरात घडलेल्या या घटनेने परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
भरदिवसा घडलेला हा जीवघेणा हल्ला सीसीटीव्हीत कैद झाला आहे. सोशल मीडियावरून हा व्हिडीओ रात्री उशिरापर्यंत व्हायरल होत होता. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलिस निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी तातडीने पोलिस पथकाला घटनास्थळी रवाना केले; मात्र तोपर्यंत हल्लेखोर हे घटनास्थळाहून फरार झालेले होते.
दरम्यान, पंचवटीत अजूनही धाक नाही सराईत गुन्हेगारांसह टवाळखोरी करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी धडक मोहीम हाती घेतलेली असताना पंचवटीत भरदुपारी घडलेल्या या प्रकाराने या मोहिमेला जणू आव्हान दिल्याचे बोलले जात आहे. गुन्हेगारी करणाऱ्यांमध्ये अजूनही कायद्याचा धाक निर्माण झालेला नाही, असे या घटनेवरून दिसते.