Assembly Election 2022: 5 राज्यांची सद्यस्थिती, कोणत्या राज्यात किती जागा अन् कुणाचं सरकार ?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2022 05:27 PM2022-01-08T17:27:49+5:302022-01-08T18:18:57+5:30

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे

Assembly Election 2022: Current status of 5 states, how many seats in which state and whose government? | Assembly Election 2022: 5 राज्यांची सद्यस्थिती, कोणत्या राज्यात किती जागा अन् कुणाचं सरकार ?

Assembly Election 2022: 5 राज्यांची सद्यस्थिती, कोणत्या राज्यात किती जागा अन् कुणाचं सरकार ?

googlenewsNext

नवी दिल्ली - देशातील उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांचे बिगुल आज वाजले आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने दिल्लीत आयोजित पत्रकार परिषदेमध्ये या विधानसभा निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली. निवडणूक आयोगाने दिलेल्या माहितीनुसार 7 टप्प्यामध्ये मतदान होणार आहे. सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक टप्प्यात सात टप्प्यात मतदान होईल. तर, गोवा आणि पंजाबमध्ये एकाच टप्प्यात मतदान होईल. 

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांनी पाच राज्यातील निवडणुकीच्या कार्यक्रमाची घोषणा केली आहे. उत्तर प्रदेशसह ऊर्वरित चारही राज्यांमध्ये आजपासून निवडणुकीची आचारसंहिता लागू झाली आहे. 10 फेब्रुवारी रोजी पहिल्या टप्प्यात मतदान होणार असून 10 मार्च रोजी निकाल घोषित करण्यात येणार आहे. तत्पूर्वी ज्या 5 राज्यांतील निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे, तेथील सद्यस्थितीचा राजकीय आढावा आपण घेऊयात. 

उत्तर प्रदेश
निवडणुका घोषित झालेल्या 5 राज्यांपैकी सर्वात मोठं राज्य असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सध्या भाजपचे सरकार आहे. उत्तर प्रदेशमध्ये एकूण 403 जागांसाठी निवडणूक होत असून बहुमताचा आकडा गाठण्यासाठी 202 जागांवर विजय मिळवावा लागेल. युपीचे सध्याचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ असून भाजपाने 303 जागांसह विजय मिळवला आहे. तर, समजावादी पक्ष 49 जागांसह प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

पंजाब
पंजाबमध्ये 117 जागांसाठी एकाच टप्प्यात निवडणूक होत असून सध्या येथे काँग्रेसचे सरकार आहे. चरणजीत सिंग हे पंजाबचे मुख्यमंत्री आहेत. 2017 च्या निवडणुकीत काँग्रेसने 77 जागांसह बहुमत सिद्ध केलं आहे. तर, 17 जागांसह आम आदमी पक्ष दुसऱ्या स्थानावर आहे. 

उत्तराखंड
उत्तराखंड 70 जागांसाठी निवडणूक होत असून 36 जागा जिंकत बहुमताचा आकडा गाठता येईल. सध्या येथे भाजपचे सरकार असून पुष्कर सिंह धामी हे मुख्यमंत्री आहेत. भाजपने 53 जागांसह बहुमत सिद्ध केले आहे. तर, 9 जागांसह काँग्रेस प्रमुख विरोधी पक्ष आहे. 

गोवा
गोव्यात 40 जागांसाठी निवडणूक होते असून राजकीय पक्षाला 21 जागांवर विजय मिळवत बहुमत सिद्ध करावे लागेल. सध्या, गोव्यात भाजपचे सरकार असून प्रमोद सावंत हे मुख्यमंत्री आहेत. 2017 मध्ये भाजपने गोव्यात 25 जागा जिंकल्या आहेत. 

मणिपूर 
मणिपूरमध्ये सध्या भाजप आघाडीचं सरकार असून भाजपने 29 जागा जिंकल्या होत्या. सध्या येथे भाजप नेते एन.बीरेनसिंह हे मुख्यमंत्री आहेत. तर, 15 जागा जिंकत काँग्रेसने प्रमुख विरोधी पक्षपद मिळवले आहे. येथे नॅशनल पिपल्स फ्रंट आणि नॅशनल पिपल्स पार्टीनेही भाजपसोबत हातमिळवणी केली आहे. 

दरम्यान, एकूणच निवडणूक जाहीर झालेल्या 5 राज्यांपैकी 4 राज्यात भाजपचा मुख्यमंत्री आणि भाजपचे सरकार आहे. तर, केवळ पंजाबमध्ये काँग्रेसचं सरकार आणि मुख्यमंत्री आहे. त्यामुळे, आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये काय होणार, याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.  

Web Title: Assembly Election 2022: Current status of 5 states, how many seats in which state and whose government?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.