‘विराट’ कामगिरीमुळे RCBचं आव्हान कायम, पण प्लेऑफमध्ये जाण्यासाठी लागेल नशिबाची साथ, आणि...

Royal Challengers Bangalore, IPL 2024: रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पराभवांच्या मालिकेमुळे एकवेळ गुणतक्त्यात तळाला होता. मात्र विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मागच्या ४ सामन्यात विजय मिळवत आरसीबीने जोरदार पुनरागमन केलं आहे.

रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा संघ यंदाच्या आयपीएलमध्ये सलग पराभवांच्या मालिकेमुळे एकवेळ गुणतक्त्यात तळाला होता. मात्र विराट कोहलीच्या दमदार कामगिरीच्या जोरावर मागच्या ४ सामन्यात विजय मिळवत आरसीबीने जोरदार पुनरागमन केलं आहे. आरसीबीचं प्लेऑफच्या शर्यतीमधील आव्हान कायम असलं तरी त्यांना शेवटच्या दोन सामन्यात विजय मिळवण्यासह नशिबाची साथही लागणार आहे. आरसीबीचा संघ कुठल्या परिस्थितीत प्लेऑफमध्ये पोहोचू शकतो. याचं समिकरणं पुढीलप्रमाणे आहे.

आयपीएलच्या गुणतक्त्यात सध्या कोलकाता नाईटरायडर्स (१६), राजस्थान रॉयल्स (१६) आणि सनरायझर्स हैदराबाद (१४) हे अनुक्रमे पहिल्या ३ क्रमांकावर आहेत. तर चेन्नई, दिल्ली आणि लखनौ प्रत्येकी १२ गुणांसह पाचव्या, सहाव्या आणि सातव्या क्रमांकावर आहेत. तर १० गुणांसह आरसीबी सातव्या क्रमांकावर आहे. त्यांचा रनरेट ०.२१७ एवढा आहे.

आरसीबीचे साखळी फेरीतील दोन सामने शिल्लक आहेत. तसेच हे दोन्ही सामने बंगळुरूतील चिन्नास्वामी स्टेडियममध्ये खेळवले जाणार आहेत. अशा परिस्थितीत हे दोन्ही सामने जिंकल्यास आरसीबीचे १४ गुण होतील. मात्र एवढं झाल्यानंतरही आरसीबीला नशिबाची साथ आवश्यक असेल.

आरसीबीचा पुढचा सामना १२ मे रोजी दिल्लीशी होणार आहे. या सामन्यात विजय मिळवल्यास दोघांचेही समान गुण होतील. मात्र चांगल्या नेट रनरेटमुळे आरसीबी पुढे जाईल. तर आरसीबीचा शेवटचा सामना हा बलाढ्य चेन्नई सुपरकिंग्सशी असेल. हे दोन्ही सामने आरसीबीसाठी महत्त्वाचे असतील.

मात्र आरसीबीपेक्षा प्लेऑफमध्ये जाण्याची चांगली संधी चेन्नईकडे आहे. चेन्नईचे ३ सामने शिल्लक आहेत. त्यांचे १२ गुण असून, रनरेटही ०.७०० एवढा आहे. या तीन पैकी एक सामना जिंकला तरी चेन्नईची प्लेऑफमधील दावेदारी भक्कम होईल. जर चेन्नईचा संघ पुढील तीनही सामन्यात पराभूत झाला तर आरसीबीच्या आशा पल्लवित होतील. तसेच चेन्नईने २ सामने गमावले तरी त्यांच्या रनरेटवर परिणाम होऊ शकतो.

लखनौ सुपरजायंट्सच्या संघाचे १२ सामन्यात १२ गुण आहेत. त्यामुळे लखनौने पुढचे दोन्ही सामने जिंकले तर त्यांचा प्लेऑफमध्ये जाण्याचा दावा पक्का होईल. मात्र दोन पैकी एकाच सामन्यात विजय मिळवल्यास लखनौ १४ गुणांवर अडकून पडेल आणि त्यांचा रनरेट -०.७६९ असल्याने त्यांची प्लेऑफच्या शर्यतीमधून बाहेर पडण्याची शक्यता बळावेल. लखनौचा संघ बाहेर पडल्यास त्याचा फायदा आरसीबीला होईल.

सध्या आयपीएलच्या गुणतक्त्यात केकेआर आणि राजस्थान रॉयल्स हे प्रत्येकी १६ गुणांसह प्लेऑफच्या उंबरठ्यावर आहेत. त्यांचे प्रत्येकी ३ सामने शिल्लक आहेत. या संघांनी आपापले तीनही सामने जिंकावेत अशी आरसीबीची अपेक्षा असेल. कारण त्यामुळे चेन्नई, दिल्ली आणि लखनौ या तीनही संघाचं गणित बिघडून जाईल.

लखनौ आणि दिल्ली यांच्यात १४ मे रोजी होणारा सामनाही महत्त्वाचा ठरणार आहे. कारण यामधील जो संघ जिंकेल त्याचे १४ गुण होतील. त्यामुळे लखनौ आणि दिल्ली यांनी किमान एक सामना गमावणे आरसीबीच्या दृष्टीने आवश्यक आहे. कारण या दोन्ही संघांपैकी कुणीही २ सामने जिंकले तर त्यांचे थेट १६ गुण होतील.