Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 9, 2026 12:26 IST2026-04-09T12:26:18+5:302026-04-09T12:26:18+5:30
Ashok Kharat : गुन्ह्याच्या तपासात खरातच्या सर्व काळ्या कारनाम्यांचा उलगडा व मूळ 'मोडस'चा पर्दाफाश होऊ शकतो. कारण याबाबत विविध स्वरूपाचे महत्त्वाचे तांत्रिक पुरावेसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत.

Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
"तुला मुलगाच होईल..." असे सांगून पीडित गर्भवती महिलेवर भोंदू खरात याने विधी करण्याच्या नावाखाली लैंगिक अत्याचार केल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या तिसऱ्या गुन्ह्याचा तपास गुरुवारपासून (दि. ९) वेग पकडणार आहे. या गुन्ह्याच्या तपासात खरातच्या सर्व काळ्या कारनाम्यांचा उलगडा व मूळ 'मोडस'चा पर्दाफाश होऊ शकतो. कारण याबाबत विविध स्वरूपाचे महत्त्वाचे तांत्रिक पुरावेसुद्धा पोलिसांच्या हाती लागले आहेत.
'ट्रस्ट'च्या खात्यावरील व्यवहाराबाबत गंभीर आरोप
खरातने जमविलेली बेहिशोबी 'माया' व त्यासंबंधित पोलिसांकडे प्राप्त झालेल्या दस्तऐवजापासून ईशान्येश्वर मंदिराच्या ट्रस्टच्या बँक खात्यासह त्याच्या वैयक्तिक बँक खात्यावरील आर्थिक व्यवहारांसंबंधित गंभीर स्वरूपाचे आरोपदेखील या फिर्यादीत करण्यात आलेले आहेत. यामुळे या गुन्ह्याचा तपास एकूणच खरात प्रकरणात महत्त्वाचा मानला जात आहे. भोंदू खरात याच्या तब्बल चाळीसपेक्षा जास्त ठिकाणांच्या संपत्तीची (स्थावर मालमत्ता) तपासणी या प्रकरणी गुन्ह्याच्या तपासात होऊ शकते.
भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
भोंदूगिरी अन् अघोरी कृत्यावर प्रकाश
भोंदू खरातकडून केले जाणारे अघोरी कृत्य, अंकशास्त्र, मंत्र-तंत्राचे प्रकार, तोडगे, मृत्यूची भीती, रिंगणात कैद अन् महापूजा, उत्तरपूजाविधीचे उपाय अशा सर्वच प्रकारच्या 'मोडस ऑपरेंडी'बाबत पुन्हा लक्ष वेधले जाण्याची शक्यता आहे.
भोंदू खरात याच्यावर एकूण आठ गुन्हे महिलांवरील लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी दाखल आहेत. या सर्व गुन्ह्यांसह एक आर्थिक फसवणुकीचा गुन्हा अशा एकूण नऊ गुन्ह्यांचा तपास सध्या एसआयटीकडून केला जात आहे.
राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यांच्या तपास अगोदर केला जात असून, त्यातील तिसऱ्या गुन्ह्याचा तपास आता वेग पकडत आहे. या गुन्ह्यात एसआयटी गुरुवारी खरातची पोलीस कोठडी मागणार आहे. संबंधित गुन्ह्याच्या तपासावर मोठी भिस्त अवलंबून असणार आहे. यामुळे या गुन्ह्यात सरकारपक्षाकडून जास्त दिवसांची पोलीस कोठडीची मागणी न्यायालयाकडे केली जाऊ शकते.
"कुटुंबात वाईट घटना, मृत्यूची भीती"; खरातने लाखो रुपये उकळलेले, कवडीमोल भावात जमीन खरेदी
या प्रकरणातील फिर्यादीने तपासी पथकाला फिर्याद देताना महत्त्वाच्या माहितीसह खरातच्या काळ्या कारनाम्याबाबतचे इलेक्ट्रॉनिक पुरावेसुद्धा सादर केले आहेत. यामुळे या गुन्ह्याच्या तपासात पोलिसांकडून अधिक सखोलपणे सर्व कंगोरे तपासले जाणार आहेत.