"खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2026 09:48 IST2026-03-27T09:20:37+5:302026-03-27T09:48:33+5:30

दोन महिन्यांपूर्वीच अशोक खरात प्रकरणाची माहिती होती असा दावा मंत्री गिरीश महाजन यांनी केला.

Ashok Kharat Actions Were Known Two Months Ago Minister Girish Mahajan Bold Claim | "खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

"खरातचे कारनामे दोन महिन्यांपूर्वीच माहित होते, आता सुटणार नाही"; मंत्री गिरीश महाजन यांचा खळबळजनक दावा

Girish Mahajan on Ashok Kharat: राज्यात सध्या गाजत असलेल्या खरात प्रकरणाबाबत मंत्री गिरीश महाजन यांनी अत्यंत खळबळजनक खुलासा केला आहे. "खरातचे काळे कारनामे आता उघडकीस आले असले, तरी या प्रकरणाची माहिती आपल्याला दोन महिन्यांपूर्वीच मिळाली होती," असा दावा गिरीश महाजन यांनी नाशिकमध्ये केला. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी योग्य पावले उचलली असून, आता खरात या चक्रव्यूहातून बाहेर पडू शकणार नाही, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

गुरुवारी नाशिक येथील भारतीय जनता पक्षाच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत गिरीश महाजन बोलत होते. यावेळी त्यांनी या प्रकरणातील तपासाची दिशा आणि राजकीय आरोपांवर स्पष्टीकरण दिले.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना होती कल्पना

गिरीश महाजन म्हणाले की, खरातच्या संशयास्पद हालचालींची कुणकुण दोन महिन्यांपूर्वीच लागली होती. या संदर्भात तातडीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपूर्ण माहिती देण्यात आली होती. प्रशासनाने आणि सरकारने अत्यंत सावधगिरीने या प्रकरणातील कारवाईची रणनीती आखली. त्यामुळेच आता पुराव्यांच्या आधारे कारवाई सुरू असून, खरातला वाचण्याची कोणतीही संधी उरलेली नाही.

जयकुमार रावल यांचा बचाव

खरातच्या देवस्थानला दिलेल्या आर्थिक मदतीवरून विरोधकांनी माजी मंत्री जयकुमार रावल यांच्यावर निशाणा साधला होता. यावर महाजन यांनी रावल यांची पाठराखण केली. "अनेकदा भाविक किंवा लोकप्रतिनिधी एखाद्या धार्मिक स्थळाला मदत करताना श्रद्धेपोटी किंवा विकासकामांसाठी करतात. त्या बाबा किंवा बुवाचे पडद्यामागचे कारनामे काय आहेत, हे आधी कोणालाही माहित नसते. तत्कालीन मंत्री जयकुमार रावल यांनी केवळ एक धार्मिक स्थळ म्हणून मदत दिली होती. खरात भविष्यात असे काही करेल, हे त्यांना आधी कसे माहित असणार?" असा सवाल महाजन यांनी उपस्थित केला.

१,५०० कोटींचे साम्राज्य आणि एसआयटीचा विळखा

भोंदू बाबा अशोक खरात याच्या आर्थिक साम्राज्यावर आता विशेष तपास पथकाने कारवाई सुरू केली आहे. खरातची १,५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक मालमत्ता तपास यंत्रणांच्या रडारवर असून, त्याच्याशी संबंधित सर्व बँक खाती तातडीने सील करण्यात आली आहेत. एसआयटीने खरात आणि त्याच्या कुटुंबीयांच्या नावावर असलेले जमीन, फ्लॅट्स, कमर्शियल गाळे आणि आलिशान वाहनांची कागदपत्रे जप्त केली असून, या अफाट संपत्तीचा मुख्य स्रोत शोधण्यावर सध्या भर दिला जात आहे. राज्यभरातील त्याच्या गुंतवणुकीचा छडा लावण्यासाठी नोंदणी व मुद्रांक विभागाची मदत घेतली जात असून, या मोठ्या कारवाईमुळे खरातच्या संबंधितांचे धाबे दणाणले आहेत.

Web Title : खरत के कारनामे पहले से ज्ञात, बचना असंभव: मंत्री महाजन

Web Summary : मंत्री गिरीश महाजन ने खुलासा किया कि अशोक खरात के मामले की जानकारी दो महीने पहले से थी। मुख्यमंत्री ने त्वरित कार्रवाई की; खरात का बचना असंभव है। एसआईटी खरात के ₹1,500 करोड़ के साम्राज्य की जांच कर रही है, संपत्तियां जब्त कर रही है और निवेश की जांच कर रही है, जिससे सहयोगी भयभीत हैं।

Web Title : Kharat's misdeeds known months ago, escape impossible: Minister Mahajan

Web Summary : Minister Girish Mahajan revealed knowing about Ashok Kharat's case two months prior. CM took swift action; Kharat's escape is impossible. SIT investigates Kharat's ₹1,500 crore empire, seizing assets and probing investments, leaving associates in fear.