नाशिक : मराठा समाजाच्या भावना दुखावणारी, सकल मराठा क्रांतीमोर्चाच्या नेतृत्व करणाऱ्या महिला प्रतिनिधीचा अवमान करणारी पोस्ट टाकणाऱ्या महंत सुधीरदास पुजारी यांच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चा समन्वयक व सकल मराठा समाज नाशिकच्या प्रतिनिधींनी पोलीस आयुक्त दीपक पांडे यांना शुक्रवारी (दि.७) दिलेल्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे.
मराठा आरक्षणावर सर्वोच्च न्यायालयाने निकाल दिल्यानंतर राज्यभर मराठा समाज दुखावलेला असतांना नाशिकचे महंत सुधीरदास पुजारी यांनी फेसबुकवर मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनच्या आयकॉन पोस्टर वरील महिला प्रतिनीधीचा फोटो टाकत सोशल मीडियावर पोस्ट व्हायरल करून मराठा समाजाच्या भावना दुखावण्याचा व चिथावणी देण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप मराठा क्रांती मोर्चा व सकल मराठा समाजाच्या प्रतिनिधींनी केला आहे. या विरोधात आम्ही पंचवटी पोलीस ठाण्यात तक्रारही दिली असून संबंधितांवर गुन्हा दाखल करून कारवाई करण्याची मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक करण गायकर व राजू देसले यांनी पोलीस आयुक्त दीपक पांडेय यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.