... अन् रोहित पवार कार्यकर्त्याच्या बुलेटने पोहोचले थेट मैदानावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 28, 2020 00:59 IST2020-12-28T00:57:47+5:302020-12-28T00:59:54+5:30
राजकीय नेते व्यासपीठावरून अनेकदा राजकीय टोलेबाजी करीत आखाडा गाजवत असतात. राजकीय आखाड्यात असे अनेक दिग्गज आहेत की त्यांच्या राजकीय फटकेबाजीने टाळ्या आणि हशांची बरसात होते. या फळीतील तसे नवखे, परंतु तरबेज असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारदेखील राजकारणाच्या मैदानावर अनेकदा टोलेबाजी करताना दिसतात. नाशिक दौऱ्यातही त्यांच्या फटकेबाजीचा अनुभव आला; परंतु ही फटकेबाजी काही राजकीय व्यासपीठावरील नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरील होती.

... अन् रोहित पवार कार्यकर्त्याच्या बुलेटने पोहोचले थेट मैदानावर
नाशिक : राजकीय नेते व्यासपीठावरून अनेकदा राजकीय टोलेबाजी करीत आखाडा गाजवत असतात. राजकीय आखाड्यात असे अनेक दिग्गज आहेत की त्यांच्या राजकीय फटकेबाजीने टाळ्या आणि हशांची बरसात होते.
या फळीतील तसे नवखे, परंतु तरबेज असलेले राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवारदेखील राजकारणाच्या मैदानावर अनेकदा टोलेबाजी करताना दिसतात. नाशिक दौऱ्यातही त्यांच्या फटकेबाजीचा अनुभव आला; परंतु ही फटकेबाजी काही राजकीय व्यासपीठावरील नव्हे तर क्रिकेटच्या मैदानावरील होती. रविवारी नाशिक दौऱ्यावर आलेले आमदार रोहित पवार हे देवळाली कॅम्प येथील कार्यक्रम आटोपून कारने नाशिकरोडकडे परतत असताना विहितगावजवळ त्यांना कार्यकर्त्यांनी सत्कारासाठी थांबविले. कार्यक्रम स्थळापासून थोडे दूर महापालिकेच्या मैदानावर काही मुले क्रिकेट खेळत असल्याचे त्यांना दिसले. त्यांनी राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विक्रम कोठुळे यांना मैदानावर घेऊन चला असे म्हणत त्यांच्या बुलेटवर बसले आणि मैदानावर पोहोचले. यावेळी नेते, कार्यकर्ते, बंदोबस्तावरील पोलीस सारेच मैदानाकडे धावले. मैदानावर पोहोचताच पवार यांनी बॅट हातात घेतली आणि सुरू केली फटकेबाजी. पंधरा मिनिटे त्यांनी मैदानाच्या चारही दिशेने चेंडू टोलविले आणि कार्यकर्त्यांच्या टाळ्या मिळविल्या. मुलांनाही चांगलाच हुरूप आला होता. त्यांनीही एकेक करीत आवर्जून रोहित पवारांसमोर गोलंदाजी केली. काही कार्यकर्त्यांनीदेखील त्यांना गोलंदाजी केली.
कार्यकर्त्यांचा चेंडू आणि नगरसेवकाने टिपला झेल
आमदार रोहित पवार फलंदाजी करीत असताना त्यांच्या पाठीमागे सर्वच कार्यकर्ते आणि पदाधिकारीदेखील होते. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते विक्रम कोठुळे यांनीही पवारांसमोर षट्क टाकले आणि त्यांचा झेल नगरसेवक जगदीश पवार यांनी टिपला.