Nashik Crime News: 'तुमच्या मुलीचा माझ्यासोबत विवाह लावून द्या, तिला माझ्याकडील अघोरी विद्या देतो', असे म्हणत त्याने आधी महिलेला भीती दाखवली. अल्पवयीन मुलीसोबत स्वतःचा साखरपुडा करून घेतला. त्यानंतर अल्पवयीन मुलगी घरी एकटी असताना गेला आणि तिच्यासोबत अश्लील चाळे केले. पण, मुलीसोबत काहीतरी भयंकर घडण्यापूर्वीच या सगळ्या प्रकरणाला वाचा फुटली. ही घटना नाशिकमध्ये घडली आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सातपूर येथील भोंदूबाबा संशयित सिद्धार्थ भाटे ऊर्फ सिद्धार्थ गुरू याच्याविरुद्ध नाशिक रोड पोलीस ठाण्यात विनयभंग, पॉक्सोचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तसेच पीडित मुलीची आई, सिद्धार्थची आई व त्याच्या एका मित्रावरही गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पीडित मुलीच्या वडिलांनी या प्रकरणात पोलिसांत फिर्याद दिली. तक्रारीनुसार, मतभेद झाल्यानंतर पत्नी मुलीला घेऊन तिचे माहेर असलेल्या नाशिक रोड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील घरी राहण्यास आली होती.
महिलेने पतीकडे लग्नासाठी मागितले एक लाख
मागील चार वर्षांपासून ती माहेरी राहत होती. फिर्यादी हे अधूनमधून मुलीला भेटण्यासाठी तेथे जात होते. १९ मे २०२५ रोजी त्यांच्या पत्नीने संपर्क साधून मुलीचे लग्न मोठ्या माणसासोबत ठरले असून, एक लाख माणसासोबत ठरले असून, एक लाख रुपयांची मागणी केली.
पीडित मुलीच्या वडिलांनी याला नकार देत अजून आपली फारकत झालेली नाही, 'तू हा निर्णय कोणाला विचारून घेतला...? असे पत्नीला विचारले असता, तिने फोन कट केला.
'माझी अघोरी विद्या तुझ्या मुलीला देतो'
आरोपी सिद्धार्थ याने 'माझ्याकडे असलेली अघोरी शक्ती मी होणाऱ्या माझ्या पत्नीला देईल, तुमच्या मुलीचा माझ्यासोबत विवाह लावून द्या, ती आमचीच आहे, तिला अघोरी व्यक्तीच चालेल...' असे सांगून दबाव आणून फिर्यादींना जीवे मारण्याची धमकी दिली.
तसेच फिर्यादीच्या पत्नीने बळजबरीने तिच्या मुलीचा सिद्धार्थसोबत साखरपुडा ती अल्पवयीन असतानाही करून दिला, असेही तक्रारीत म्हटलेले आहे.
आरोपीला अटक करण्याची मागणी
भोंदूगिरी करणारा संशयित सिद्धार्थ भाटे याच्याविरुद्ध जादूटोणाविरोधी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करत अटक करावी, अशी मागणी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती व महाराष्ट्र महिला तक्रार निवारण केंद्राच्या नाशिक रोड शाखेच्या समुपदेशन केंद्राकडून पोलिस आयुक्त संदीप कर्णिक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
कर्णिक यांनी पीडितेच्या वडिलांना नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद देण्यास सांगितले. यानुसार सोमवारी रात्री उशिरा नाशिक रोड पोलिसात त्यांनी तक्रार नोंदविली.
याप्रकरणी पोलिसांनी सखोल 3 चौकशी करावी, अशी मागणी 'अंनिस'चे राज्य प्रधान सचिव डॉ. टी. आर. गोराणे, जिल्हा कार्याध्यक्ष आशा लांडगे, अरुण घोडेराव, महेंद्र दातरंगे अॅड. सुशीलकुमार इंदवे, रंजन लोंढे आदींनी केली आहे.