पावसासोबतच विविध रंगी छत्र्या, रेनकोटचेही बाजारात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 18:53 IST2020-06-08T18:48:53+5:302020-06-08T18:53:39+5:30
जूनच्या पहिल्या आठवड्यात पाऊस दाखल झाला असून शहरात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुळे सारे काही ठप्प झालेले असताना सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आले. त्यामुळे पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील विविध दालने गजबजून गेली आहे.

पावसासोबतच विविध रंगी छत्र्या, रेनकोटचेही बाजारात आगमन
नाशिक : शहरात कोरोनाने सारे काही ठप्प झाले असले तरी पाऊसरूपी निसर्ग त्याच्या निर्धारित वेळेला अर्थात जूनच्या पहिल्या आठवड्यात दाखल झाला आहे. दरम्यान, सोमवारपासूनच सर्व दुकाने खुली करण्याचे आदेश देण्यात आल्याने पावसासोबतच बाजारात विविध रंगी छत्र्या, रेनकोट या पावसाळी वस्तूंनी बाजारपेठेतील विविध दालने गजबजून गेली आहे.
गत वर्षी पावसाचे प्रमाण जास्त असल्याने तसेच यंदादेखील सरासरी पाऊस पडण्याचे अंदाज वर्तवण्यात आल्याने मार्केटमध्ये उपलब्ध असलेल्या छत्री, रेनकोट यांसह इतर वस्तूंची विक्री आठवडाभरात वेग पकडणार आहे. यंदाही या वस्तूंची विक्री मोठ्या प्रमाणावर होण्याची अपेक्षा असल्याने मार्केटमध्ये नवीन व्हरायटी असलेल्या वस्तू दाखल झाल्या आहेत. महिन्याच्या प्रारंभीच वरुणराजाने हजेरी लावल्यामुळे रेनकोट, छत्र्या, पावसाळी टोप्या, ताडपत्री, प्लॅस्टिक पेपर आणि अन्य साहित्य घेण्यासाठी नागरिकांची काही प्रमाणात लगबग सुरू झाली आहे. रेनकोटची स्वतंत्र दालने नागरिकांना खुणावू लागली आहेत. लहान मुलांचे आकर्षण असलेल्या रेनकोटमध्ये यंदा कार्टूनची प्रिंट असलेल्या रेनकोटची भर पडली आहे.
तीन घडीच्या छत्र्या दाखल
पुरुषांच्या बहुतांश छत्र्या एकच घडीच्या असतात. आता मात्र त्यात बदल होऊन तीन घडी करून अगदी लहान आकार होणाºया छत्र्यादेखील दाखल झाल्या आहेत. अशा लहान छत्र्यादेखील यंदाचे आकर्षण राहणार आहे. तसेच महिलांच्या रंगीबेरंगी आणि बालकांच्या कार्टुन्सच्या चित्रांनी सजलेल्या छत्र्यांचा आकर्षक लूक ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
बालकांसाठी कार्टून रेनकोट
लहान मुलांमध्ये आकर्षण असलेल्या कार्टूनची प्रिंट असलेले रेनकोट्सदेखील मार्केटमध्ये दाखल झाले आहेत. त्यात डोरेमॉन, स्पायडर मॅन, बेन टेन, नोबिता अशा विविध कार्टून्सची चित्र असलेल्या रेनकोट्सचे आकर्षण मुलांमध्ये असल्याचे विक्रे त्यांनी सांगितले. त्याचबरोबर छोटा भीम, शक्तिमान यांसारख्या सुपर हिरोंच्या रेनकोट्सनादेखील बाजारात मागणी वाढण्याची शक्यता आहे.