Age Shambhari crosses, voting enthusiasm is immense! | वय शंभरी पार, मतदानाचा उत्साह अपार!

वय शंभरी पार, मतदानाचा उत्साह अपार!

नाशिक : एकीकडे सर्वसामान्यांसह सुशिक्षित मतदारांमध्ये मतदानाबद्दल अनास्था वाटत असताना दुसरीकडे वयाची शंभरी पार केलेल्या सिन्नर तालुक्यातील दापूर व येवला तालुक्यातील गवंडगाव येथील आजीबार्इंनी मतदानाचा हक्क बजावून समाजासमोर आदर्श उभा केला आहे.
दापूर येथील म्हाळूंशेठ केदार यांच्या मातोश्री व माजी सरपंच गोविंदशेठ केदार यांच्या आजी अनुसयाबाई त्र्यंबक केदार यांनी वयाच्या १०४ व्या वर्षी मतदानाचा हक्क बजावला. केदार कुटुंबातील प्रकाश केदार, राजू केदार, विजय केदार, सुरेश केदार, दिपक केदार यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतला. तसेच मतदार जागृतीसाठी विशेष प्रयत्नही केले.
येवला येथील गुजराथी कुटुंबातील १०३ वर्षांच्या चमेलीबाई गुजराथी या आजीसह त्यांच्या कुटुंबातील मुलगा, नातू, पणतू, सुना यांनी येथील एकाच मतदान केंद्रात जाऊन मतदान केले. महत्त्वाची बाब म्हणजे आजी आजारी असतानादेखील मतदानासाठी आल्या होत्या. गुजराथी कुटुंबातील चमेलीबाई गुजराथी यांनी मुलगा अरु णचंद्र गुजराथी, नातू मयूर गुजराथी व पणतू महर्षी गुजराथी यांच्यासह सुना, नातवंडे यांनी एकत्रितरित्या मतदानाचा अधिकार बजावला.
या आजींनी आपल्या चार पिढ्यांना मोठे होताना पाहिले. स्वातंत्र्यांनतर त्यांनी कधीही मतदान चुकवले नाही. घरच्यांसोबत लोकशाहीचा उत्सव नेहमी साजरा केला. आज आजी आजारी असतानादेखील त्यांनी कुटुंबासह येऊन मतदानाचा हक्क बजावला.
भगूर येथील ति.झं. विद्यामंदिर शाळेतील मतदान केंद्रावर पार्वतीबाई मोजाड या १०२ वर्षे वयाच्या आजींनी आप्तेष्टांसमवेत येऊन उत्साही वातावरणात मतदान केले.
असेच एक उर्जादायी उदाहरण येवला तालुक्यातील म्हणता येईल. गवंडगाव येथील भगीरथीबाई सीताराम संत यांनी १०१ व्या वर्षी आपल्या नातलगांचा आधार घेत मतदान करुन तरुणांसह इतर मतदारांना प्रोत्साहीत केले आहे.
गौळाणेतील आजीबार्इंनी जपली अखंडित मतदानाची परंपरा!
१९६२ साली झालेल्या पहिल्या निवडणुकीपासून
ते आतापर्यंत १४व्या विधानसभा निवडणुकीपर्यंत नॉनस्टॉप मतदानाचा हक्क गौळाणे (ता. नाशिक) येथील शंभर वर्षे वयोमान असलेल्या सखूबाई नामदेव चुंभळे या आजीबार्इंनी बजावला.
सखूबार्इंनी देवळाली मतदारसंघात आपला नातू विश्वास चुंभळे यांच्यासोबत मतदान केंद्र गाठत मतदान केले. आपण पहिल्या निवडणुकीपासून मतदान करत आलो असून, मतदान करणे ही आनंदाची गोष्ट असते. त्यामुळे तो आनंद प्रत्येक मतदाराने घेतला पाहिजे, अशी भावना सखूबार्इंनी व्यक्त केली.

Web Title:  Age Shambhari crosses, voting enthusiasm is immense!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.