‘आनंददायी जीवनशैली’ स्वीकारावी

By Admin | Updated: October 12, 2016 23:23 IST2016-10-12T23:10:43+5:302016-10-12T23:23:17+5:30

जागतिक हृदय दिन : मान्यवरांनी साधला चर्चासत्रात संवाद

Accept a 'pleasant lifestyle' | ‘आनंददायी जीवनशैली’ स्वीकारावी

‘आनंददायी जीवनशैली’ स्वीकारावी

नाशिक : ताणतणाव, चुकीचा आहार, व्यायामाकडे होणारे दुर्लक्ष, धावपळीच्या युगात शरीरात घडून येणाऱ्या रासायनिक बदलांमुळे प्रकृतीवर विपरीत परिणाम होत असून, सगळ्यांनी आनंददायी जीवनशैलीचा अंगीकार करायला हवा, असा सूर दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या चर्चासत्रात उमटला.
जागतिक हृदय दिनानिमित्त दादासाहेब गायकवाड सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या या चर्चासत्रात डॉ. राजीव शारंगपाणी (पुणे), मानसरोगोपचारतज्ज्ञ डॉ. नंदू मुलमुले (नांदेड) आणि हृदयरोग तज्ज्ञ डॉ. मनोज चोपडा यांनी सहभाग घेतला होता. यावेळी डॉ. मनोज चोपडा यांनी आरोग्यासाठी शिक्षण आणि रोगप्रतिबंधक उपाययोजना याची समाजाला असलेली गरज, तणावरहित कसे जगावे, बिघडलेले जीवनचक्र, नात्यांमध्ये निर्माण होणार दुरावा, शरीरातील बदलांकडे केले जाणारे दुर्लक्ष तसेच मधुमेह, हृदयरोग, उच्चरक्तदाब आदि विकार
कसे जडतात, याबाबत मार्गदर्शन केले.
डॉ. राजीव शारंगपाणी यांनी आनंददायी जीवनासाठी शरीर निरोगी असायला हवे, असे आवाहन केले. आनंद शोधण्यासाठीदेखील अलीकडे ताण घेतला जातो असे सांगताना व्यायाम न करणे, उशिरा उठणे, अवेळी जेवण यामुळे शरीरावर कसा परिणाम घडतो आणि आपली जीवनशैली बदलते हे सोदाहरण स्पष्ट केले. व्यायाम करताना वजन उचलणे, सायकल चालवणे, पोहणे, गिर्यारोहण करणे, योगासने आदिंचे सातत्य असायला हवे, असेही डॉ. शारंगपाणी यांनी अधोरेखित केले.
डॉ. नंदू मुलमुले यांनी मानवी शरीरावर अंतर्गत आणि वाह्य बाबींवर होणारे परिणाम, निरोगी असतानाही वैद्यांकडे जाऊन आपल्या तब्येतीबाबत तणाव प्रकट क रणे चुकीचे असल्याचे सांगितले. जीवनात खरा आनंद निसर्गापासून मिळत असल्याने आपण अधिकाधिक निसर्गाच्या सान्निध्यात जायला हवे, असे आवाहन मुलमुले यांनी केले. ताणतणावामुळे हृदयविकार आणि मधुमेहाला निमंत्रण मिळत असल्याने तणावविरहित जीवन जगायला हवे, असे आवाहन डॉ. मुलमुले यांनी यावेळी केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. सुनील संकलेचा यांनी तर स्वागत डॉ. रश्मी चोपडा यांनी केले. दादासाहेब गायकवाड सभागृह येथे झालेल्या या कार्यक्रमास मान्यवरांसह रुग्ण तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Accept a 'pleasant lifestyle'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.