अंगणवाडी बांधण्यासाठी हवे नऊ लाख
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2018 00:50 IST2018-02-15T00:47:52+5:302018-02-15T00:50:20+5:30
नाशिक : बांधकाम साहित्यांच्या वाढीव दरामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी निर्धारित असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून ती ९.१४ लक्ष करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अर्पणा खोसेकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.

अंगणवाडी बांधण्यासाठी हवे नऊ लाख
नाशिक : बांधकाम साहित्यांच्या वाढीव दरामुळे अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यासाठी निर्धारित असलेली सहा लाखांची मर्यादा वाढवून ती ९.१४ लक्ष करण्यात यावी, अशी मागणी जिल्हा परिषदेच्या महिला व बालविकास सभापती अर्पणा खोसेकर यांनी महिला व बालकल्याण मंत्री पंकजा मुंडे यांच्याकडे केली आहे.
शासनाच्या निर्णयानुसार अंगवणवाडी केंद्र इमारतीचे बांधकाम करण्यासाठी बिगर आदिवासी क्षेत्रात ६ लाख तर आदिवासी क्षेत्रात ६ लाख ६० हजारांचा खर्च करण्याची मान्यता देण्यात आलेली आहे. मात्र सद्यस्थितीत या रकमेत बांधकाम करणे शक्य नसल्याचा अभिप्राय बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांनी दिल्याने रक्कम वाढवून देण्याची मागणी खोसकर यांनी केली आहे. नाशिक जिल्ह्णात ४४७६ अंगणवाडी केंद्रे व ५०६ मिनी अंगणवाडी केंद्रे आहेत. त्यापैकी आदिवासी भागातील २६९७ व बिगर आदिवासी क्षेत्रातील २५८५ अंगणवाडी केंद्रे असून, २६३ अंगणवाडी केंद्रांना शासकीय स्वतंत्र इमारती नसल्याने सदरची अंगणवाडी केंद्रे खासगी जागेत आहेत. काही अंगणवाड्या या ग्रामपंचायत कार्यालयात, प्राथमिक शाळेत, समाजमंदिरात, वाचनालयात भरतात.
याबरोबरच सध्या वाळू, सीमेंट, विटा या साहित्यांच्या दरामध्येदेखील मोठ्या प्रमाणात वाढ झालेली आहे. तसेच जीएसटी वाढीमुळे अंगणवाडी बांधकामे ६ लाखात होत नसल्याने ही मर्यादा वाढविण्याची मागणी करण्यात आली आहे.
बांधकाम विभागाच्या अंदाजपत्रकानुसार एक अंगणवाडी केंद्र इमारत बांधण्यासाठी किमान ९.१४ लाखांचा खर्च अपेक्षित आहे. त्यानुसार वित्तीय मर्यादेत वाढ करण्यात यावी, अशी मागणी खोसकर यांनी नोंदविली आहे.