शहरात आज २९ कोरोनाबाधित; हॉटस्पॉट ठरलेल्या जुन्या नाशकात १७ रुग्ण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 8, 2020 22:17 IST2020-06-08T22:16:27+5:302020-06-08T22:17:37+5:30
अमरधामरोडवरील एका धार्मिकस्थळाजवळ सहा महिन्याचा चिमुकलाही कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले.

शहरात आज २९ कोरोनाबाधित; हॉटस्पॉट ठरलेल्या जुन्या नाशकात १७ रुग्ण
नाशिक : शहरात कोरोनाचा कहर सुरू झाला असून सोमवारी (दि.८) नवे २८ रुग्ण महापालिका क्षेत्रात आढळून आले. त्यापैकी जुन्या नाशकात रात्री पावणेदहा वाजेपर्यंत १७ रुग्ण आढळून आले. शहराची कोरोनाबाधितांची संख्या आता सुमारे ४३६वर पोहचली आहे. जुन्या नाशकात कोरोनाचा उद्रेक सुरूच आहे. दोन दिवसांत या भागात तब्बल ४१ रुग्ण आढळून आले आहे. मंगळवारी सकाळी जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा परिसर संपुर्ण ‘सील’ केला जाणार आहे.
रविवारी (दि.७) रात्री साडेनऊ वाजेपर्यंत ६१ कोरोनाबाधित रूग्ण आढळून आले होते. जुने नाशिक परिसर शहराचा नवा हॉटस्पॉट बनला असून हा संपुर्ण परिसर तत्काळ महापालिकेने ‘कन्टेंन्मेंट झोन’ म्हणून ‘सील’ करण्याची मागणी आता होऊ लागली आहे. जुने नाशिकमधील नाईकवाडीपुरा भागात रविवारी १९ रुग्ण मिळून आले होते. यानंतर सोमवारी दिवसभरात बागवानपुरा भागात ६ तर कुंभारवाड्यात ४, नाईकवाडीपुरा-२, आझाद चौक (चव्हाटा)-१, अमरधाम रोड-२, खडकाळी-१, शिंगाडा तलाव-१ असे जुने नाशिक भागात सोमवारी आढळून आलेली रुग्णसंख्या आहे. अमरधामरोडवरील एका धार्मिकस्थळाजवळ सहा महिन्याचा चिमुकलाही कोरोनाबाधित असल्याचे अहवालातून समोर आले. जुन्या नाशकातील नाईकवाडीपुरा भागातील एका वृध्दाचा कोरोनाने बळी घेतला असून अद्याप अधिकृतपणे या भागातील दोन कोरोनाबाधित मृत्यूमुखी पडले आहे. शहरात कोरोनाने मृत्यूमुखी पडलेल्यांची संख्या आता २१ वर पोहचली आहे.
दिवसेंदिवस जुन्या नाशकातील रुग्णसंख्या वेगवेगळ्या भागात वाढू लागली आहे. महापालिका क्षेत्रात कोरोनाबाधित रूग्णांचा आकडा अद्यापही कमी होत नसल्याने मनपा आरोग्य प्रशासनापुढे मोठे आव्हान उभे राहिले आहे.
एकीकडे लॉकडाऊन शिथिल केला जात असून राज्य शासनाच्या आदेशान्वये मनपा प्रशासन ‘मिशन बिगेन अगेन’ राबविण्याचा प्रयत्ना आहे, तर दुसरीकडे शहरात कोरोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाणदेखील वाढत आहे. त्यामुळे आता महापालिका प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण होताना दिसत आहे.