‘इन्साफ मिलने की मुझे खुशिया हैं..’, नाशिकच्या कारागृहात सुटका होताच मुज्जमीलची प्रतिक्रिया
By अझहर शेख | Updated: July 22, 2025 00:10 IST2025-07-22T00:10:20+5:302025-07-22T00:10:35+5:30
2006 Mumbai Train Blasts: मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोघे संशयित आरोपी हे २०१६सालापासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भाेगत होते. सोमवारी (दि.२१) उच्च न्यायालयाने १२ संशयित आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली.

‘इन्साफ मिलने की मुझे खुशिया हैं..’, नाशिकच्या कारागृहात सुटका होताच मुज्जमीलची प्रतिक्रिया
नाशिक - मुंबईतील लोकल रेल्वेगाड्यांमध्ये २००६ साली घडविण्यात आलेल्या साखळी बॉम्बस्फोटातील दोघे संशयित आरोपी हे २०१६सालापासून नाशिकच्या मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भाेगत होते. सोमवारी (दि.२१) उच्च न्यायालयाने १२ संशयित आरोपींची या गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता करण्यात आली. यामधील दहावा संशयित आरोपी मुज्जमील अताउर रहेमान शेख याने कारागृहातून बाहेर येताच ‘इन्साफ मिलने की मुझे खुशियाँ हैं.. अशी प्रतिक्रिया दिली. सोमवारी (दि.२१) सायंकाळी त्याच्यासह पॅरोलवर बाहेर असलेला नववा संशयित मोहम्मद साजिद मरगुब अन्सारी याचीही सुटका करण्यात आली.
या साखळी बॉम्बस्फोटप्रकरणी बारा जणांना मुंबई पोलिसांनी अटक केली होती. संशयित आरोपींना न्यायालयाने जिल्हा सत्र न्यायालयाने शिक्षा सुनावली होती. परंतु, संबंधित आरोपींनी पुन्हा मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत त्याविरुद्ध अपील दाखल केले होते. उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निकाल रद्द करत १२ संशयितांची निर्दोष मुक्तता केली. या बारा जणांपैकी मोहम्मद साजिद अन्सारी व मुजम्मिल शेख हे दोघे २००६ सालापासून नाशिकरोड येथील मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत होते. अन्सारी याची पत्नी आजारी असल्यामुळे त्याला पॅरोल कारागृह प्रशासनाकडून मंजूर करण्यात आला होता. त्यामुळे तो बाहेर असून मंगळवारी तो पुन्हा कारागृहात येऊन कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण करून परतणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. मध्यवर्ती कारागृहात असलेल्या मुजमिल शेख याच्या बाबतीत उच्च न्यायालय प्रशासनाकडून कारागृह प्रशासनाला ई-मेल प्राप्त झाल्यानंतर सोमवारी सायंकाळी त्याची सुटका करण्यात आली. तब्बल नऊ वर्षे तो या कारागृहात बंदिस्त होता. मुज्जमील याने सायंकाळी कारागृहाचा उंबरा ओलांडला.
कारागृहातून वकिलीचा अभ्यास
मुज्जमील शेख व मोहम्मद साजीद अन्सारी हे दोघेही उच्चशिक्षित आहेत. दोघांनी अभियांत्रिकी विद्याशाखेतून त्यांचे उच्चशिक्षण पुर्ण केले आहे. मुज्जमील याने नाशिकच्या कारागृहात शिक्षा भोगत असताना ‘एलएलबी’ला प्रवेश घेत वकिलीचा अभ्यास सुरू केला होता. तसेच अन्सारी हादेखील अभियंता असल्याचे सुत्रांनी सांगितले.