कॉँग्रेस प्रवक्ता पाटील यांच्या घरातून पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे लंपास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 13, 2019 14:12 IST2019-02-13T14:06:59+5:302019-02-13T14:12:56+5:30
कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता

कॉँग्रेस प्रवक्ता पाटील यांच्या घरातून पंधरा लाखांचे सोन्याचे बिस्किटे लंपास
नाशिक : शहरातील टिळकवाडी येथे राहणाऱ्या कॉँग्रेस प्रवक्ता डॉ. हेमलता निनाद पाटील यांच्या बंगल्यातील कपाटात ठेवलेले सोन्याचे पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड घेऊन नोकर तब्बल महिनाभरापूर्वी गायब झाला; मात्र त्यांचे पती फिर्यादी निनाद पाटील यांच्या हा प्रकार मंगळवारी रात्री उशिरा लक्षात आल्याने त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. दरम्यान, संशयित नोकराच्या परभणी पोलिसांनी सेलू गावातून मुसक्या आवळल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, टिळकवाडी येथे पाटील यांचा बंगला आहे. त्यांच्या बंगल्यात बंडू म्हसे हे मागील अनेक वर्षांपासून नोकर म्हणून कार्यरत आहे. मागील चार ते पाच महिन्यांपासून त्यांचा मुलगा आकाश म्हसे हादेखील नोकर म्हणून रोजंदारीवर बंगल्यात कामाला येत होता. त्याने कपाटाची चावी चोरून कपाटामध्ये ठेवलेली सोन्याची सुमारे पंधरा लाख रुपये किंमतीची पाच बिस्कीटे व दहा हजाराची रोकड १३ जानेवारी रोजी घेऊन पोबारा केला. तेव्हापासून आकाश कामावर येत नव्हता तो परभणीच्या सेलू या मूळ गावी गेला असल्याचे सांगण्यात आले होते. दरम्यान, फिर्यादी पाटील यांनी कपाट उघडून बघितले असता कपाटामधील सोन्याची बिस्कीटे व रोकड नसल्याचे त्यांना मंगळवारी (दि.१२) रात्रीच्या सुमारास लक्षात आले. त्यांनी तत्काळ सरकारवाडा पोलिसांना या घटनेची माहिती दिली. याप्रकरणी रात्री उशिरा पोलीस ठाण्यात चोरीचा गुन्हा संशयित आकाशविरूध्द दाखल करण्यात आला.
दरम्यान, पोलिसांनी याबाबत परभणी पोलिसांकडे विचारणा केली असता त्यांनी सेलू गावातून दोन ते चार दिवसांपुर्वी आकाश नावाच्या एका संशयिताला सोन्याची बिस्कीटे विक्री करताना ताब्यात घेतल्याची माहिती दिली. त्याने चोरीचे बिस्कीटे नाशिकमधून आणल्याचे येथील पोलिसांनी सांगितले. तसा गुन्हा नाशिकला दाखल झाला आहे. दरम्यान, परभणी पोलिसांकडून संशयित आकाशला सरकारवाडा पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार असून पोलीस त्याची कसून चौकशी करत पुढील तपास करणार असल्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक अशोक भगत यांनी सांगितले.