शाळा यावर्षीही जूनमध्ये सुरू होण्याची चिन्हे नाहीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:32+5:302021-05-21T04:31:32+5:30

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शासनाने आखून दिलेले नियम व ...

There are no signs of school starting in June this year either | शाळा यावर्षीही जूनमध्ये सुरू होण्याची चिन्हे नाहीत

शाळा यावर्षीही जूनमध्ये सुरू होण्याची चिन्हे नाहीत

मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यानंतर कोरोना बाधितांचे प्रमाण अत्यंत कमी झाल्याने नववी ते बारावीचे वर्ग शासनाने आखून दिलेले नियम व अटीनुसार चालू झाले होते. मात्र केवळ अडीच ते तीन महिने विद्यार्थी शाळेत गेले. जानेवारी महिन्यातही पाचवी ते आठवीचे वर्ग शासनाने नियम आखून देत सुरू केले. मात्र मार्च महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या टप्प्याने कहर माजविल्यामुळे शिक्षक व विद्यार्थी कोरोना बाधित आढळून आले. त्यामुळे सरसकट सगळे वर्ग शासनाला बंद करावे लागले. नंतर एवढी भयावह परिस्थिती निर्माण झाली की, त्यामुळे यावर्षीची दहावीची परीक्षाही शासनाला रद्द करावी लागली. बारावी परीक्षेचेही भिजत घोंगडे पडले असून अद्यापही काही निर्णय झालेला नाही.

जे विद्यार्थी यावर्षी पहिलीला होते, त्यांनी शाळेचे तोंड न बघताच त्यांना दुसऱ्या वर्गात प्रवेश देण्यात आला आहे. इतर वर्गाचेही तसेच आहे. वर्षभर शाळेत न जाताही विद्यार्थ्यांना वरच्या वर्गात पाठविण्यात आले आहे. शाळा सुरू न झाल्यामुळे विद्यार्थ्यांचे खूप मोठे शैक्षणिक नुकसान झाले आहे. शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईनचा पर्यायी मार्ग असला तरी ग्रामीण भागामध्ये अनेक पालकांकडे अँड्रॉइड मोबाईल नसल्यामुळे त्यांच्या मुलांना ऑनलाईन क्लासही जॉईन करता आले नाही. परिणामी वर्षभर मुले घरीच असल्यामुळे त्यांच्या मनातील शिक्षणाविषयी मानसिकतेवर तर परिणाम झालाच आहे. परंतु पूर्ण वर्षच वाया गेल्याने त्यांचे शैक्षणिक नुकसानही मोठ्या प्रमाणात झाले आहे.

कोरोनाच्या पहिल्या लाटेमध्ये वृद्ध व्यक्ती मोठ्या प्रमाणावर बाधित झाले होते. तर आता दुसऱ्या लाटेमध्ये तरुण वर्ग मोठ्या प्रमाणावर बाधित झाले. दुसऱ्या लाटेमध्ये मृत्यूचे प्रमाणही मोठ्या प्रमाणावर वाढले. आता तिसऱ्या लाटेचा परिणाम लहान मुलांवर होणार असून शासनाने लसीकरणाचा टप्पा वाढविला नाही, तर सलग दुसऱ्या वर्षीही विद्यार्थ्यांना शाळेत जाण्यापासून वंचितच राहावे लागेल. म्हणून लसीकरणाचा टप्पा वाढविला तर बाधित होण्याचे प्रमाण कमी होऊन निदान दिवाळीनंतर तरी शाळा सुरू होतील, अशा प्रतिक्रिया पालकांमधून ऐकायला भेटत आहेत.

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची शक्यता तज्ज्ञांनी वर्तविली असून लहान मुलांवर त्याचा सर्वाधिक परिणाम होणार आहे. मागील वर्षापासून शाळा सुरू झालेल्या नाहीत. त्यामुळे मुलांचे मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक नुकसान झाले आहे. शासनाने लसीकरणाचा वेग वाढविल्यास निदान दिवाळीनंतर तरी आमची मुले शाळेत जाऊ लागतील. म्हणून यापुढे तरी मुलांचे होणारे शैक्षणिक नुकसान टाळता येईल.

- दिनेश मटू माळी, पालक जयनगर. ता. शहादा.

Web Title: There are no signs of school starting in June this year either