नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 15, 2021 04:28 IST2021-03-15T04:28:00+5:302021-03-15T04:28:00+5:30

भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान कसे राहील, याच्या अंदाजाचा वेध घेणारे एक पत्रक नुकतेच ...

This summer will be hot for Nandurbar district | नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार

नंदुरबार जिल्ह्याच्या दृष्टीने यंदाचा उन्हाळा तापदायक राहणार

भारतीय हवामान विभागाने यंदाचा उन्हाळी हंगाम मार्चपासून मे महिन्यापर्यंत तापमान कसे राहील, याच्या अंदाजाचा वेध घेणारे एक पत्रक नुकतेच प्रसिद्ध केले. देशातील दक्षिणेकडची काही राज्ये वगळता यंदा उन्हाच्या झळा अपेक्षेपेक्षा जास्तच तीव्र असतील, असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मार्च, एप्रिल आणि मे या महिन्यांमध्ये यंदा उत्तर, ईशान्य, वायव्य भारत आणि पूर्वेकडच्या काही भागांमध्ये सरासरीपेक्षा अधिक कमाल तापमान तर हिमालयाच्या पायथ्याशी असलेले प्रदेश, ईशान्य आणि दक्षिणेकडच्या काही राज्यांमध्ये या कालावधीतील किमान तापमान सरासरीपेक्षा जास्त असेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यंदा ओडिशा, छत्तीसगढसह महाराष्ट्रातील कोकण विभागाला यंदा तीव्र उन्हाळ्याचा इशारा देण्यात आला आहे.

तापमानाचा अंदाज जास्त वर्तवल्याने शेतकऱ्यांनी उन्हाळी पिकास, फळबागांना केळी, पपई, भाजीपाला पिकांना गरजेनुसार योग्य अंतराने पाणी देण्याची व्यवस्था करावी. जेणेकरून पिकांना उष्माचा ताण बसणार नाही आणि जमिनीचे तापमान नियंत्रित राहील. कमी पाणी लागणाऱ्या पिकांची आणि कमी कालावधीत येणाऱ्या वाणांची निवड करावी, आंतरमशागतीची कामे वेळेवर करावीत, तण व्यवस्थापन करावे, पिकात प्लास्टिक आच्छादनाचा वापर करावा, जेणेकरून मातीतील पाण्याचे बाष्पीभवन कमी होऊन ओलावा जास्त वेळ टिकून राहील, अशी माहिती कृषी हवामान शास्त्रज्ञ सचिन फड यांनी दिली.

हवामानात होणारे बदल तसेच दर मंगळवारी आणि शुक्रवारी विस्तृत हवामान अंदाज आणि कृषी सल्ला जिल्हा कृषी हवामान केंद्र, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबार यांच्याकडून whatsapp व इतर माध्यमातून देण्यात येतो, तो मिळवण्यासाठी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी ८२७५००९६५९/८८०५५११४८८ या नंबरवर व्हॅाट्‌सॲपवर मेसेज करावा, तसेच जिल्ह्याचा हवामान अंदाज आणि कृषी सल्ला पाहण्यासाठी मोबाइलच्या प्ले स्टोअरमधून ‘मेघदूत’ ॲप डाऊनलोड करावे, अशी माहिती डॉ. हेडगेवार सेवा समिती, कृषी विज्ञान केंद्र, नंदुरबारचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख राजेंद्र दहातोंडे यांनी दिली.

Web Title: This summer will be hot for Nandurbar district