बाजार परिसर बॅरीकेटींग लावून सील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2020 12:46 IST2020-04-10T12:46:42+5:302020-04-10T12:46:50+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागात बॅरेकेटींग करण्यात आले आहे. यामुळे गर्दी विभागली ...

Seal by barricading the market premises | बाजार परिसर बॅरीकेटींग लावून सील

बाजार परिसर बॅरीकेटींग लावून सील

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : बाजारपेठेत होणारी गर्दी लक्षात घेता विविध भागात बॅरेकेटींग करण्यात आले आहे. यामुळे गर्दी विभागली गेली असून मंगळबाजार, सुभाष चौकाचा परिसरात गुरुवारी शुकशुकाट दिसून आला. प्रशासनाच्या या उपाययोजना पूर्वीच केल्या गेल्या असत्या तर आतापर्यंत नागरिकांनाही कारवाईला सामोरे जावे लागले नसते आणि प्रशासनावरील ताणही कमी झाला असता.
बाजारात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी होणारी गर्दी लक्षात घेता त्यावर नियंत्रण मिळविण्याची मोठी कसरत पोलीस आणि पालिका कर्मचाऱ्यांना करावी लागत होती. नागरिकांना सांगूनही ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने पोलिसांना कारवाई करावी लागत होती. त्यामुळे शेवटचा उपाय म्हणून गर्दी होणारा मंगळबाजार, सुभाष चौक, अमृत चौक पुर्णत: सील करण्यात आला आहे. या भागातील विक्रेत्यांना इतर ठिकाणी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यामुळे गर्दीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले आहे.
सहा ठिकाणी बॅरीकेटींग
सुभाष चौक व मंगळ बाजारात येणारे सहा रस्ते सील करण्यात आले आहेत. या ठिकाणी लोखंडी व लाकडी बॅरीकेट्स लावण्यात आले आहेत. त्यामुळे भाजीपाला, फळ व यासह इतर वस्तू विक्रेते या भागात जावू शकले नाही. या विक्रेत्यांची दुकाने लागली नसल्याने खरेदी करण्यासाठी नागरिकही फिरकले नाहीत. जे दुकाने आहेत ते सुरू होते. तेथे खरेसाठी बॅरीकेट्सच्या बाहेर वाहन उभे करून पायी त्या भागात जावे लागत होते. त्यामुळे गर्दीवर मोठ्या प्रमाणावर नियंत्रण येवू शकले.
बॅरीकेट्स लावण्यात आलेल्या रस्त्यांमध्ये अमर टॉकीजकडून येणारा, जुन्या पालिका चौकाकडून, भतवाल टॉकीजकडून, बँक आॅफ इंडिया, तूप बाजार, भोई गल्ली व भारत फूट वेअर या भागाकडून येणारे रस्ते सील करण्यात आले आहेत. मुख्यधिकारी बाबुराव बिक्कड, अभियंता गणेश गावीत, आरोग्य अधिकारी रवि काटे, प्रभारी कार्यालय अधिक्षक संजय माळी, मतिन शेख, हंदराज राजपूत, किशोर वाडिले आदी उपस्थित होते.
परिसरातच खरेदी करावी
नागरिकांनी आपल्या परिसरातील दुकानांमधूनच किराणा, फळ, भाजीपाला खरेदी करावा. त्यासाठी पायी जाणे शक्य असल्यास पायी जावे. शहरातील बाजार पेठेत खरेदीसाठी येवू नये. यामुळे होणारी गर्दी कमी होणार आहे.
यासाठीच ही उपाययोजना करण्यात आली आहे. भाजीपाला व फळ विक्रेत्यांनी देखील आपल्या लॉरी लावतांना रस्त्यावरील विविध भागात ठराविक अंतरानेच त्या उभ्या कराव्या. पालिकेने आणि पोलिसांनी दिलेल्या निर्देशांचे पालन करावे असे आवाहन देखील करण्यात आले आहे.


जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशापर्यंत या प्रकारची बॅरीकेटींग कायम राहणार आहे. या भागातील विक्रेत्यांना दिलेल्या इतर ठिकाणच्या जागेवर जावून व्यवसाय करावा.
नागरिकांनी दिलेल्या सुचनांचे आणि नियमांचे पालन करावे. आपल्या परिसरातच वस्तू खरेदी कराव्या.
बॅरीकेटींग केलेल्या भागाच्या आत कुणी रस्त्यावर बसून व्यवसाय करण्याचा प्रयत्न केल्यास त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. यासाठी पालिकेचे कर्मचारी गस्त घालणार आहेत.

Web Title: Seal by barricading the market premises