पावरा-बारेला समाजाच्या बैठकीत रात्रीच्या विवाह कार्याला फाटा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 12:36 PM2021-01-17T12:36:15+5:302021-01-17T12:36:22+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाजाने रात्रीऐवजी दिवसा लग्नकार्य करण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेतला असून ...

Pavara-Barela split the night wedding work at the community meeting | पावरा-बारेला समाजाच्या बैठकीत रात्रीच्या विवाह कार्याला फाटा

पावरा-बारेला समाजाच्या बैठकीत रात्रीच्या विवाह कार्याला फाटा

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
नंदुरबार : अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाजाने रात्रीऐवजी दिवसा लग्नकार्य करण्याचा निर्णय समाजाच्या बैठकीत घेतला असून यासंदर्भातील पहिला विवाह रामपूर प्लॉट, ता.शहादा येथे होणार आहे. याचबरोबरच विवाह समारंभात दारुबंदी व बॅण्डबंदीचाही निर्णय घेण्यात आला.
पानसेमल (मध्य प्रदेश) येथे अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाज मंडळाची चालीरिती व रुढीपंरपरेबाबत नामदेव पटले यांच्या अध्यक्षतेखाली सभा झाली. या सभेत रात्रीऐवजी दिवसा लग्नकार्य करण्याचे ठराव मौखिकरित्या संमत झाला. त्यास मान देऊन पालन करण्यासाठी रामपूर प्लॉट व रामपूर येथे अगोदर परंपरेनुसार रात्रीचे लग्नकार्य ठरलेले असताना ते रद्द करून आता दिवसा करण्याचे ठरले. ही स्तुत्य व समाजाला आदर्शवत सुरुवात या गावातून होत आहे. धडगाव तालुक्यात आता शक्यतो दिवसाच लग्नकार्य होतात. परंतु तळोदा, शहादा, शिरपूर, चोपडा व सीमेलगतच्या मध्य प्रदेशात रात्रीच लग्नकार्य होतात. तेही आता दिवसाच लग्नकार्य करतील हा फार मोठा बदल या समाजाच्या प्रथेत होत आहे. रात्रीच्या लग्नकार्यात दारुचा वापर, बॅण्डच्या म्युझिकने तरुण पिढी बिघडण्याच्या वाटेवर होती. या निर्णयामुळे मात्र नक्कीच दिलासा मिळणार आहे. रात्रीच्या लग्नकार्यामुळे भानगडी होतात, जागरणामुळे आरोग्यावरही परिणाम होतो. दिवसा लग्नकार्य केल्याने खर्चात आर्थिक बचत व सामाजिक सलोखा  चांगला राहणार असल्याने ते एक मोठे परिवर्तन आहे.
रामपूर प्लॉट येथे मानसिंग जेबरा पावरा यांच्या मुलाचे लग्न रात्री ठरले होते. ते आता रद्द करून २२ जानेवारी रोजी दिवसा करण्याचे ठरले. याबाबत प्लॉट गावात गावपंचांची बैठक झाली. पोलीस पाटील लुका पावरा, सरपंच नर्मद्या पावरा, जहांगीर पावरा, विक्रम जेबरा पावरा, सखाराम पावरा, इंजि.जेलसिंग पावरा यांच्या पुढाकाराने रात्रीच्या परंपरेला फाटा देत दिवसा लग्नकार्य करण्याचे ठरले. त्यामुळे पावरा समाजाने या कुटुंबाचे कौतुक केले. रामपूर येथील दादला फुलसिंग पावरा यांच्या मुलाचेही २१ जानेवारी रोजी रात्री लग्नकार्य होते. त्यासाठी पत्रिकाही छापलेली होती. परंतु ते रद्द करून आता हे लग्नकार्यही २२ जानेवारी रोजी दिवसा करण्याचे ठरले. रामपूर येथीलच किलंडर गोविंद पावरा यांच्याकडेही     २४ जानेवारी रोजी दिवसा लग्नकार्य होणार आहे. रामपूरचे सरपंच नर्मद्या गुलाब पावरा, रायसिंग पवार, जुगा पावरा, चिकारसिंग पावरा, लक्ष्मण पावरा, भरत नावडे आदी गावप्रमुखांनी इंजि.जेलसिंग पावरा यांच्या पुढाकाराने या आदर्श प्रथेची सुरुवात करण्यात आली.
पानसेमल येथे झालेल्या सभेत पावरा समाजाच्या हितासाठी ठराव मांडण्यात आले. या ठरावांना एकमताने मौखिक मान्यता देण्यात आली असून गाव समितीला अधिकार देण्यात आले आहेत. सभेत विविध विषयांवर समाजाच्या मान्यवरांनी मते मांडली व त्यास हात उंच करुन मान्यता देण्यात आली. इंजि.जेलसिंग पावरा यांनी लग्नकार्य रात्रीऐवजी दिवसा करण्यावर प्रकाश टाकला. रात्रीच्या कार्यक्रमात दारुचा वापर होत असल्याने तरुण पिढी व्यसनाकडे वळते, भानगडी होतात व जास्तीचा खर्चही होतो. त्यामुळे दिवसा लग्न केल्याने आर्थिक बचत होऊन तरुण पिढीही व्यसनाच्या आहारी जाणार नाही. सामाजिक सलोखा टिकून राहण्यास मदत मिळून अनेक फायदे होतील, असे सांगितले. शिरपूरचे आमदार काशीराम पावरा यांनीही व्यसनमुक्तीवर भर दिला. सुरेश मोरे यांनी भेटप्रथा तर गौतम खर्डे यांनी पोलीस पाटलांचे अधिकाराबाबत माहिती   दिली. नामदेव पटले, पानसेमलचे ठाणसिंग पवार, माजी आमदार दिवाणसिंग पटेल, मेहरबान खर्डे यांनीही चर्चेत भाग घेतला.

बैठकीत चर्चा करुन केलेले ठराव
पानसेमल येथे अखिल भारतीय आदिवासी पावरा-बारेला समाज मंडळाच्या बैठकीत पुढील विषयांवर चर्चा होऊन मौखिक ठरावास मान्यता देण्यात आली. त्यात गाव पाटील यांना पोलीस पाटीलचे अधिकार व मानधन, भेटप्रथा- आहेरचे मूल्य, भांडी, कपडे, दागदागिने, लग्नकार्य फक्त दिवसा वा रात्री, मुलगा-मुलगी पळून जाऊन लग्न करण्यावर चर्चा, जुळलेला विवाह तुटला तर काय?, दारुबंदी व बॅण्ड बंद करणे, मानता, गृहप्रवेश, इंदल पूजेमध्ये आहेर, भेट प्रथेबाबत या विषयांवर चर्चा करण्यात आली.

Web Title: Pavara-Barela split the night wedding work at the community meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.