नंदूरबार रेल्वे स्थानकाची तपासणी वाऱ्यावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2021 04:59 IST2021-02-21T04:59:43+5:302021-02-21T04:59:43+5:30

महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील मध्यस्थानी असलेल्या नंदूरबार रेल्वेस्थानक सार्वजनिक ठिकाणी कोरोना आजार संक्रमण होण्याची दाट शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून ...

Nandurbar railway station inspection on air | नंदूरबार रेल्वे स्थानकाची तपासणी वाऱ्यावर

नंदूरबार रेल्वे स्थानकाची तपासणी वाऱ्यावर

महाराष्ट्र व गुजरात सीमेवरील मध्यस्थानी असलेल्या नंदूरबार रेल्वेस्थानक सार्वजनिक ठिकाणी कोरोना आजार संक्रमण होण्याची दाट शक्यता असताना रेल्वे प्रशासनाकडून खबरदारी घेतली जात नसल्याने कोरोना आजार संक्रमित होण्याची भीती प्रवाशांनी व्यक्त केली आहे. जिल्ह्याच्या केंद्रस्थानी व गुजरात-महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर रेल्वेस्थानक असून येथून अमळनेर, जळगाव, भुसावळ या मार्गांकडे उत्तर महाराष्ट्रामधील प्रवासी ये-जा करतात. तर, गुजरात राज्यातील बारडोली, सुरत, बडोदा, अहमदाबाद या मार्गावरील प्रवासी रेल्वेतून प्रवास करतात. उद्योग व्यवसायासाठी आंतरजिल्ह्यातून व आंतरराज्यातून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असल्याने तपासणी होणे आवश्यक आहे.

शासनाच्या निर्देशानुसार सार्वजनिक ठिकाणी मास्क लावणे आवश्यक व बंधनकारक असताना नंदूरबार रेल्वेस्थानकामध्ये कर्मचारी व प्रवासी विनामास्क दिसून येत आहेत. प्रवाशांवर रेल्वे प्रशासनाकडून कार्यवाही होत नसल्याचे चित्र दिसून येत आहे. कार्यवाही केलेल्या व दंडीत केलेल्या प्रवाशांच्या संख्येबाबत रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता प्रवाशांकडून दंड वसूल करण्याचे काम आमचे नसून तिकीट तपासणी करणाऱ्यांचे असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले. तिकीट तपासणी कर्मचाऱ्याने आम्हाला लेखी आदेश मिळाला नसल्याने आम्ही कार्यवाही करू शकत नाही. मात्र, प्रवाशांना वारंवार सूचना देण्यात येतात, असे त्यांनी सांगितले.

रेल्वेस्थानकांत विनामास्कवर कार्यवाही करणार कोण

रेल्वे स्थानकांत प्रवासी,खाद्यपदार्थ विक्री करणारे दुकानदार व कामगार,रेेल्वे प्रशासनातील कर्मचारी व रेल्वे पोलीस दलातील कर्मचारी मास्क लावत नसून शासन नियमाबाबत निष्काळजीपणा करताना दिसून येत आहे. त्यामुळे मास्क न लावणाऱ्यांवर कार्यवाही करणार कोण,असा प्रश्न निर्माण होत आहे. रेल्वेस्थानक प्रवेशद्वाराजवळ हात निर्जंतुक करण्यासाठी सॅनिटायझर व ताप मोजणे आवश्यक असताना तपासणी न करता प्रवाशांना स्थानकांत सोडले जात असल्याचे चित्र आहे.

फक्त आंतरजिल्हा व राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची चौकशी

स्थानकांत रेल्वेगाडी आल्यावर प्रवासी विनामास्क खरेदी करतात,त्यामुळे कोरोना रोगाचा संसर्ग वाढण्याची शक्यता असून रेल्वे प्रशासनाकडून कारवाई करण्याची गरज आहे.रेल्वेस्थानकात फक्त आंतरजिल्हा व राज्यातून येणाऱ्या प्रवाशांची फक्त तिकीट बुकिंग केलेल्या प्रवाशांची फक्त नावालाच चौकशी करण्यात येत आहे. चौकशीत कोणतीही शारीरिक चाचणी न करता फक्त नावनोंदणी करण्यात येत आहे. रेल्वेेे प्रशासनाने आंतरजिल्हा व राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची शारीरिक तपासणी करणे आवश्यक आहे.

Web Title: Nandurbar railway station inspection on air