नंदुरबार: अंत्ययात्रेला पार करावी लागते मरणयातनांची वाट; नदीच्या पाण्यातून घेऊन जावा लागतो मृतदेह
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 15:43 IST2025-07-04T15:35:12+5:302025-07-04T15:43:46+5:30
शेगवे गावासाठी निर्माण केलेली दफनभूमी तथा स्मशानभूमी गावाच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात गावाजवळून वाहणाऱ्या नेसू नदीला वारंवार पूर येतात.

नंदुरबार: अंत्ययात्रेला पार करावी लागते मरणयातनांची वाट; नदीच्या पाण्यातून घेऊन जावा लागतो मृतदेह
नंदुरबार : केलखेडी (ता. अक्कलकुवा) येथे पुलाअभावी विद्यार्थ्यांचे होणारे हाल ताजे असताना आता नवापूर तालुक्यातील शेगवे येथील समस्याही पुढे आल्या आहेत. येथील ग्रामस्थांना नेसू नदी पार करून आप्तस्वकीयांच्या अंत्यविधीसाठी जावे लागत आहे. नदीवर पूल नसल्याने पलीकडे असलेल्या स्मशानभूमीत नागरिकांना पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागत आहे.
शेगवे गावासाठी निर्माण केलेली दफनभूमी तथा स्मशानभूमी गावाच्या पलीकडे आहे. पावसाळ्यात गावाजवळून वाहणाऱ्या नेसू नदीला वारंवार पूर येतात. यामुळे गावाच्या दुसऱ्या बाजूला असलेल्या स्मशानभूमीत जाण्यासाठी ग्रामस्थांना मोठा धोका पत्करावा लागतो. या ठिकाणी जाण्यासाठी पूल नसल्याने खांद्यावर तिरडी घेऊन पुराच्या पाण्यातून वाट काढावी लागते.
पाण्याचा स्तर वाढल्यास अंत्यविधीसाठी आलेल्यांच्या जिवालाही धोका निर्माण होत आहे. परंतु याकडे गेल्या अनेक वर्षांत प्रशासनाने लक्ष दिलेले नाही.
दोन दिवसांपूर्वी शेगवे गावातील इमाबाई वसावे यांचा मृत्यू झाला. मृतदेह स्मशानभूमीत नेण्यासाठी नातेवाइकांना नदी पार करावी लागली.
पुराच्या पाण्यातून पलीकडे जाणाऱ्या खांदेकऱ्यांच्या छातीपर्यंत पाणी आल्याचे विदारक चित्र समोर आले होते. जिल्हा प्रशासनाने या प्रकाराकडे गांभीर्याने लक्ष देत तातडीने पुलांचे बांधकाम करण्याची ग्रामस्थांची मागणी आहे.