नवापूर : शहरातील सार्वजनिक गुजराती व मराठी हायस्कूल परिसरात माकडांनीशिक्षक आणि विद्यार्थ्यांना चावा घेतल्याची घटना बुधवारी (दि. ११ फेब्रुवारी) सकाळी घडली. घटनेनंतर शिक्षकांनी वनविभागाच्या कार्यालयात धाव घेतली असता, तेथे अधिकारीच उपस्थित नसल्याने शिक्षकांनी तीव्र संताप व्यक्त केला.
बुधवारी सकाळी झालेल्या शिक्षक सी.एस. पाटील, विजय कदम, जुनेद खान, तसेच विद्यार्थी रुतवीज कोकणी, यहुशवा गावीत, दुर्गेश मराठे, क्रिटीन गावीत व दिव्या भोई यांना माकडांनी चावा घेतल्याची घटना घडली. या घटनेमुळे शाळा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गेल्या चार महिन्यांपासून शाळा परिसरात माकडांचा मोठ्या प्रमाणावर उपद्रव सुरू आहे. माकडे शाळेच्या मैदानात प्रवेश करून विद्यार्थ्यांच्या दप्तर, जेवणाचे डबे पळविण्यासह व शालेय साहित्याचे नुकसान करत आहेत. काही वेळा विद्यार्थ्यांच्या अंगावर माकड धावून जात आहेत. धावून जाण्याचे प्रकार घडत असल्याने पालकांमध्येही चिंता व्यक्त होत आहे.या संदर्भात शाळा प्रशासनाने यापूर्वी अनेक वेळा वनविभागाशी पत्रव्यवहार करून माहिती दिली होती. मात्र, केवळ तात्पुरती कारवाई करण्यात येत असून, प्रत्यक्षात माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करण्यात आलेला नाही, असे शाळा प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
दरम्यान, दहावी व बारावीच्या परीक्षा केंद्र म्हणून या शाळेची निवड करण्यात आली आहे. परीक्षेच्या कालावधीत मोठ्या संख्येने विद्यार्थी शाळेत येणार असून, माकडांचा उपद्रव कायम राहिल्यास एखादी गंभीर दुर्घटना होण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत एखाद्या विद्यार्थ्यास इजा झाल्यास त्याची जबाबदारी कोण घेणार, असा सवाल शिक्षकांनी उपस्थित केला आहे.घटनेनंतर शिक्षकांनी तहसील कार्यालयात जाऊन तहसीलदार दत्तात्रय जाधव यांना निवेदन सादर करून शाळेची व्यथा मांडली. यावेळी मुख्याध्यापक मिलिंद वाघ यांनी नवापूर वनविभागाच्या कार्यपद्धतीबाबत तीव्र नाराजी तहसीलदारांसमोर व्यक्त केली.
निवेदन दिल्यानंतर वनविभागाचे कर्मचारी शाळेच्या आवारात दाखल झाले असून, त्यांनी माकड पकडण्यासाठी पिंजरा लावला आहे. माकडांनी यापूर्वी शाळेच्या आवारात उभ्या असलेल्या अनेक शिक्षकांच्या दुचाकी वाहनांचे नुकसान झाल्याची माहितीही समोर आली आहे. वनविभागाने तातडीने लक्ष देऊन माकडांचा कायमस्वरूपी बंदोबस्त करावा, अशी मागणी शिक्षकांनी केली आहे. वेळीच ठोस उपाययोजना न झाल्यास आंदोलनाचा मार्ग अवलंबावा लागेल, असा इशाराही शिक्षकांनी दिला आहे.
Web Summary : Monkeys attacked teachers and students at a Navapur school. School administration expressed anger as forest officials were absent. Students are in fear due to the continued monkey menace. They demand immediate action from the forest department.
Web Summary : नवापुर के एक स्कूल में बंदरों ने शिक्षकों और छात्रों पर हमला किया। वन अधिकारियों के अनुपस्थित रहने पर स्कूल प्रशासन ने नाराजगी व्यक्त की। बंदरों के लगातार खतरे से छात्र भयभीत हैं। उन्होंने वन विभाग से तत्काल कार्रवाई की मांग की है।