तलाव उशाला, कोरड घशाला; बापदेव पाड्यावरील नागरिक डबक्यातील, झऱ्यातील पाण्यावर भागवितात तहान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:31 IST2021-05-21T04:31:45+5:302021-05-21T04:31:45+5:30

बापदेव पाडासह अन्य पाडे हे शहादा तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाजाची वस्ती असलेले पाडे आहेत. या डोंगर भागात छोट्या-मोठ्या पाड्यांचा ...

Lake Ushala, dry throat; Citizens of Bapdev Pada quench their thirst in puddles and springs | तलाव उशाला, कोरड घशाला; बापदेव पाड्यावरील नागरिक डबक्यातील, झऱ्यातील पाण्यावर भागवितात तहान

तलाव उशाला, कोरड घशाला; बापदेव पाड्यावरील नागरिक डबक्यातील, झऱ्यातील पाण्यावर भागवितात तहान

बापदेव पाडासह अन्य पाडे हे शहादा तालुक्यातील संपूर्ण आदिवासी समाजाची वस्ती असलेले पाडे आहेत. या डोंगर भागात छोट्या-मोठ्या पाड्यांचा समावेश आहे. या पाड्यांवर जायला अजूनही पक्का रस्ता नसल्याने येथील आदिवासींना दगड-मातीच्या पायवाटेने पायपीट करावी लागत आहे. या पाड्यावर पिण्याच्या पाण्यासाठी मुबलक विहिरीही नसल्याने पावसाळ्यात डोंगराच्या झऱ्यातील पाण्यावर येथील आदिवासी आपली तहान भागवितात. पावसाळा सरला की, या आदिवासींना जवळील कपारीत पिण्यासाठी पाणी शोधावे लागत आहे. या पाड्यांवर कूपनलिका, विहिरी खोदूनही त्या कोरड्याठाक पडल्याने काही वर्षांपूर्वी शासनाची पाणीपुरवठा योजना राबविण्यात आली; मात्र कंत्राटदारांच्या नाकर्तेपणामुळे या योजनेचा बोजवारा उडाल्याने येथील आदिवासींचे नळाच्या पाण्याचे स्वप्न हवेत विरले गेले.

सध्या बापदेव पाड्यासह परिसरातील पाड्यांतील आदिवासी बांधवांना घोटभर पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. सुमारे दोन किलोमीटर दगड-गोट्यांतून पायपीट करीत या पाड्यांवरील आदिवासी महिला डोंगर दऱ्यात सुरू असलेल्या खड्ड्यांतून पिण्यासाठी पाणी आणत आहेत. हे पाणी अशुद्ध असल्याने या आदिवासींचे आरोग्य धोक्यात आले आहे.

जनावरे व नागरिक पितात एकाच डबक्यातले पाणी

कोटबांधणीजवळील बापदेव पाड्यावरील नागरिकांनी खोदलेल्या एकाच डबक्यातील पाणी जनावरे व नागरिकांना प्यावे लागत आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, प्रशासन याकडे कानाडोळा करत असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. आदिवासी पाड्यात पाण्यासह इतर समस्या गंभीर आहेत; परंतु आदिवासी नागरिक अज्ञानी असल्याने आपल्या समस्या प्रशासनाकडे मांडत नसल्याने त्याचा फायदा प्रशासन घेत असून, दुर्गम भागातील वस्तीमध्ये जाण्यासाठी दुर्लक्ष करत असल्याचे चित्र दिसून येत आहे.

हातपंप निकामी

सातपुड्यातील अतिदुर्गम भागात कूपनलिकांसह विहिरी खोदण्यात आल्या आहेत; परंतु त्यात पाणी नसल्याने कुचकामी ठरत होते. त्यासाठी ठिकठिकाणी हातपंप उभारण्यात आले; परंतु हातपंपांच्या देखभाल-दुरुस्तीकडे संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे हातपंप निकामी ठरत आहेत.

Web Title: Lake Ushala, dry throat; Citizens of Bapdev Pada quench their thirst in puddles and springs