लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : पोलीस रेझिंग डे निमित्ताने (पोलीस स्थापना दिवस) शहरातील शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनींना पोलिसांच्या कामकाजाबाबत माहिती व्हावी व त्यांच्यामध्ये पोलिसांप्रती आपलेपणाची भावना जागृत व्हावी यासाठी येथील पोलीस ठाण्यात कार्यक्रम घेण्यात आला.शहरातील शेठ व्ही.के. शहा विद्या मंदिर, एसएनडीटी महिला महाविद्यालय, भामरे माध्यमिक विद्यालय, जिल्हा परिषद शाळा कलमाडी आदी शाळा- महाविद्यालयातील विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षकांचा सहभाग होता. विद्यार्थी-विद्यार्थिनी व शिक्षक यांना पोलीस ठाण्यात तक्रार नोंद, विविध रजिस्टर, सीसीटीएनएस प्रणाली, वायरलेस सेट, गोपनीय शाखेतील कामकाज, पोलीस ठाण्यात असलेली विविध शस्त्रे आदींबाबत उपविभागीय पोलीस अधिकारी पुंडलिक सपकाळे, पोलीस निरीक्षक अरविंद पाटील, सहायक पोलीस निरीक्षक नीलेश वाघ, दिनेश भदाणे, फौजदार राजेश पाटील, योगिता पाटील, विक्रांत कचरे, हवालदार रमण वळवी, वायरलेस चालक गंगा तायडे, गोपनीय शाखेतील पोलीस नाईक पुष्पेंद्र कोळी यांनी माहिती देऊन त्यांनी विचारलेल्या विविध शंकांचे निरसन केले.वाहतूक शाखेचे पोलीस कर्मचारी अजय पवार यांनी वाहतूक नियमाबाबत प्रात्यक्षिक करून दाखवले तसेच ई-चलन प्रणाली याचेही प्रात्यक्षिक दाखवले. उपस्थित विद्यार्थी व विद्यार्थिनी यांनी पोलीस ठाण्यातील कामकाज, पोलिसांशी प्रत्यक्ष संवाद व पोलीस ठाण्यातील शस्त्रे पाहून समाधान व्यक्त केले.
विद्यार्थ्यांनी जाणून घेतली माहिती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 3, 2020 11:49 IST