५० मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2020 13:00 IST2020-04-09T13:00:13+5:302020-04-09T13:00:59+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क तळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ ...

Hunger strike on a shepherd family | ५० मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ

५० मेंढपाळ कुटुंबावर उपासमारीची वेळ

लोकमत न्यूज नेटवर्क
तळोदा : आपल्या मेंढ्या चारण्यासाठी गेल्या तीन ते चार महिन्यांपासून तळोदा तालुक्यात स्थलांतरीत झालेल्या ५० मेंढपाळ कुटुंबांना गाव बंदी बरोबरच जिल्हा बंदीमुळे उपासमारीला तोंड द्यावे लागत असल्याची त्यांची व्यथा आहे. शेतमालक व एक-दोन व्यक्ती व्यतिरिक्त या कुटुंबांना अजून कोणाचीच मदत मिळाली नाही. एवढेच नव्हे शासनाच्या मदतीपासूनदेखील ते उपेक्षित आहे. निदान शासनाने तरी आम्हाला मदतीचा हात द्यावा अथवा आमच्या गावाकडे जाऊ द्यावे, अशी विनंतीही त्यांनी केली आहे.
आपल्या मेंढ्यांना चारण्यासाठी मेंढपाळ कुटुंबे दरवर्षी दिवाळीनंतर मेंढपाळ कुटुंबे स्थलांतर करीत असतात. तब्बल पाच ते सहा महिने ते इकडेच राहत असतात. पावसाळा सुरू होण्यापूर्वी ते पुन्हा आपल्या गावाकडे जात असतात. यंदाही नंदुरबार व धुळे जिल्ह्यातील शनिमांडळ, रनाळा, निजामपूर, निसर्डे येथील साधारण ५० कुटुंबे तळोदा तालुक्यातील चिनोदा, भवर, प्रतापपूर, सिलींगपूर, करडे, काजीपूर, तलावडी, जावदा या गावांमधील शेत शिवारात स्थलांतरीत झाले आहे. सद्या कोरोना या महामारीने संपूर्ण देशात धुमाकूळ घातला आहे. साहजिकच ग्रामीण भागातही त्याची दहशत पसरली आहे. त्याचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी गावा-गावातील गावकरी आपल्या गावाच्या सीमादेखील बंद करू लागले आहेत. तथापि जिल्हा बंदीबरोबरच गाव बंदीचा फटका मेंढपाळ कुटुंबांनादेखील बसत आहेत. कारण शेत शिवारातून गावात किराणा अथवा दळण दळण्यासाठी येवू शकत नाही. परिणामी त्यांच्यावर अक्षरश: उपासमारीची वेळ आल्याची व्यथाही या कुटुंबांनी बोलून दाखविली आहे. एवढेच नव्हे शासनाची अथवा स्वयंसेवी संस्थांची मदत अजून पोहोचली नसल्याचे ते म्हणतात. एकीकडे कुणीही अन्नापासून उपाशी राहणार नाही असे सरकार म्हणते. मात्र दोन वेळच्या जेवणासाठी आम्हाला मोठा संघर्ष करावा लागत आहे. आमच्या कुटुंबासोबत आमची लहान बालकेदेखील आहेत.
या बंदीमुळे त्यांना वेळेवर जेवण देऊ शकत नाही, असेही ते सांगतात. वास्तविक आमचे संपूर्ण आयुष्यच भटकंतीचे असते. त्यामुळे शासनाच्या योजनेशिवाय जीवन जगत असतो. निदान महामारी सारख्या नैसर्गिक आपत्तीत तरी शासनाने मदत करणे अपेक्षित आहे. परंतु प्रशासनानेच कानावर हात ठेवले असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शासनाने आम्हाला रेशन द्यावे, अन्यथा आम्हाला आमच्या गावाकडे स्थलांतरीत करू द्यावे, अशी अपेक्षा कुटुंबांनी व्यक्त केली आहे.

कोरोना या महामारीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी आपसातील संपर्क टाळणे हाच एकमेव उपाय असल्यामुळे ही कुटुंबेदेखील एकमेकांपासून इतरत्र विखुरले आहेत. काही कुटुंबे तर दुसऱ्या ठिकाणी स्थलांतरीत झाले आहेत. या कुटुंबांना काही शेतमालक थोड्याफार प्रमाणात जीवनावश्यक वस्तु देत आहेत. आमलाड येथील सामाजिक कार्यकर्ते डॉ.रामराव आघाडे व तेथील ग्रामसेवक चुडामण सरगर यांनी काही काही कुटुंबांना गहू, तांदूळ, बिस्कीटे आदी वस्तुंचे वाटप केले होते. त्यांच्याकडे सद्या थोडेफार धान्य असले तरी गावबंदीमुळे दळणाचा प्रश्न आहे. निदान त्यासाठी तरी प्रशासनाने प्रयत्न करावे, असे त्यांचे म्हणणे आहे.

मेंढ्या चारण्यासाठी साक्री तालुक्यातील निसर्डे येथून तळोदा तालुक्यातील शेत शिवारात आले आहे. कोरोनाच्या महामारीमुळे कुणीच गावात येवू देई ना साहजिकच किराणा अथवा दळण दळण्याची समस्या उभी राहिली असून, यामुळे उपासमारीची वेळ आली आहे. निदान शासनाने तरी रेशन बरोबरच आवश्यक वस्तु उपलब्ध करून द्याव्यात.
-गढवर करे, मेंढपाळ, निसर्डे, ता.साक्री

Web Title: Hunger strike on a shepherd family