गोगापूर परिसरात वादळी पावसाने नुकसान, घरांचे पत्रे उडाली; जीवितहानी टळली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:34 IST2021-05-25T04:34:42+5:302021-05-25T04:34:42+5:30

सोमवारी दुपारी दोन वाजेपावेतो गोगापूर परिसरात कडाक्याचे ऊन होते. अचानक अडीच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वादळाला सुरुवात ...

Heavy rains in Gogapur area damaged houses; No casualties were reported | गोगापूर परिसरात वादळी पावसाने नुकसान, घरांचे पत्रे उडाली; जीवितहानी टळली

गोगापूर परिसरात वादळी पावसाने नुकसान, घरांचे पत्रे उडाली; जीवितहानी टळली

सोमवारी दुपारी दोन वाजेपावेतो गोगापूर परिसरात कडाक्याचे ऊन होते. अचानक अडीच वाजेच्या सुमारास वातावरणात बदल होऊन जोरदार वादळाला सुरुवात झाली. त्याचबरोबर काही प्रमाणात गारपीट होऊन पावसाला सुरुवात झाली. त्यामुळे गोगापूरसह तिधारे, लोहारे, जवखेडा परिसराला जोरदार फटका बसला. त्यात गोगापूर येथील नारायण राजपुरोहित यांच्या किराणा दुकानाचे पत्रे उडून दुकानात पावसाचे पाणी घुसून किराणा सामानाची नासधूस झाली. त्यामुळे त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचे समजते. जवळच असलेले वीज खांब उन्मळून पडले असून परिसरातील घरांचे पत्रे उडून नुकसान झाले. सुदैवाने जीवितहानी टळली. तसेच शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेला हरभरा पाण्यामुळे ओला झाला. याची माहिती मिळताच पं.स. सदस्य गणेश पाटील, योगेश पाटील, सरपंच विजय सोनवणे, गोपाळ पावरा, जितू पाटील, उपसरपंच ऋषीकेश पाटील यांनी परिसरात पाहणी केली.

केळी पिकाला पुन्हा फटका

वादळी पावसामुळे गोगापूर, जवखेडासह परिसरात केळी पिकासह पपई पीक भुईसपाट झाले असून शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने त्वरित पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

तहसीलदारांची भेट

शहादा तालुक्यातील लोहारा येथे सोमवारी दुपारी साडेचार वाजेच्या दरम्यान अचानक वादळाला सुरुवात झाली. या वादळामुळे १० ते १५ घरांचे पत्रे उडून तसेच भिंत पडून नुकसान झाले आहे. अनेक झाडांसह १५ ते २० विजेचे खांबही उन्मळून पडले आहेत. त्यामुळे वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे कुठेही जीवितहानी झाली नसली तरी नुकसान मोठे झाले आहे. सायंकाळी उशिरा शहादा तहसीलदार डॉ.मिलिंद कुलकर्णी यांनी घटनास्थळी जाऊन भेट देऊन तलाठ्यांना तातडीने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत.

गेल्या आठ दिवसांपूर्वी वादळी वाऱ्यामुळे केळी पिकाचे नुकसान झाले होते. सोमवारी दुपारी अचानक आलेल्या वादळी पावसामुळे थोड्या प्रमाणात राहिलेले केळी पीक संपूर्ण भुईसपाट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक फटका बसला आहे. संबंधित विभागाने नुकसान भरपाई द्यावी, अशी अपेक्षा आहे.

-संतोष नामदेव ठाकरे, शेतकरी, जवखेडा, ता.शहादा

गोगापूर परिसरात अचानक आलेल्या वादळामुळे घरांची पत्रे व विजेचे खांब उन्मळून पडले आहेत. त्यामुळे परिसरातील नागरिकांसह शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. संबंधित विभागाने पंचनामे करुन नुकसानग्रस्तांना तातडीने भरपाईची रक्कम द्यावी.

-गणेश पाटील, पं.स. सदस्य, ब्राह्मणपुरी गण

Web Title: Heavy rains in Gogapur area damaged houses; No casualties were reported