पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 3, 2021 04:19 IST2021-07-03T04:19:56+5:302021-07-03T04:19:56+5:30

जयनगर : यावर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकल्यासारखा वाटत आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू ...

Crops started wilting due to heavy rains | पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली

पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली

जयनगर : यावर्षी हवामान खात्याचा अंदाज चुकल्यासारखा वाटत आहे. शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिके कोमेजू लागली आहेत. शेतकरी चिंताग्रस्त आहेत.

यावर्षी सरासरी एवढा पाऊस पडेल, असा अंदाज हवामान खात्याने वर्तविला होता. मात्र जून महिन्यात शहादा तालुक्यातील जयनगरसह परिसरातील गावांमध्ये केवळ एकच दमदार पाऊस झाला. तेव्हा बऱ्याच शेतकऱ्यांनी लागवड व पेरणी केली होती. नंतर दोन-तीन वेळेस हलका स्वरूपात पाऊस झाल्यावर उर्वरित शेतकऱ्यांनी पिकांची लागवड तसेच पेरणी केली. आता बऱ्याच दिवसांपासून पावसाने दडी मारल्याने छोटे-छोटे पिके कोमेजू लागली आहेत. पावसाअभावी पिकांची वाढ तर खुंटलीच, शिवाय पिके माना टाकल्यागत दिसत आहेत.

शहादा तालुक्‍यात अनेक शेतकऱ्यांनी दुबार लागवड केली असून, आताही बरेच दिवस झाले तरी पाऊस नसल्याने उगवलेली छोटी-छोटी पिके पाण्याअभावी कोमेजू लागली आहेत. लागवड व पेरणीनंतर चांगला पाऊस होईल या आशेने बळीराजाने रासायनिक खतांची ही जुळवाजुळव करून ठेवली आहे. मात्र पाऊस नसल्याने पिकांना खतेही देता येत नाहीये.

ज्या शेतकऱ्यांनी खरीपपूर्व कापसाची लागवड तसेच पपई, केळी, ऊस या पिकांची लागवड केली होती, अशा पिकांची वाढदेखील पावसाअभावी खुंटली आहे. मात्र ज्या शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्यावरच उत्पन्न घ्यावे लागते, त्यांच्या पिकांना पाणी नसून पाऊस येईपर्यंत पिके तग धरतील का, अशी चिंता सतावत आहे.

कोट

७ जूनला चांगला पाऊस पडला होता, तेव्हा मी कापूस लागवड केली होती. लागवडीनंतर १० ते १२ दिवस पाऊस न झाल्याने निम्म्याहून अधिक कापूस बियाणांची नवीन लागवड करावी लागली. आता कुठे तीन - चार पानांचा कापूस झाला असून, पावसाने दडी मारल्यामुळे पीक कोमेजू लागले आहे. - सुनील पांडू माळी, जयनगर

Web Title: Crops started wilting due to heavy rains