हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2021 04:29 IST2021-08-29T04:29:46+5:302021-08-29T04:29:46+5:30
ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात ...

हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा
ब्राह्मणपुरी : गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासन निर्मल ग्राम योजनेंतर्गत विविध योजना राबवित आहे. खेडोपाडी घरोघरी शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. परंतु घरी शौचालय असतानाही उघड्यावर शौचास जाणे, घाण करणे सुरू असून, हागणदारीमुक्त योजनेचा बोजवारा उडाल्याचे वास्तव तालुक्यातील ग्रामीण भागात बघायला मिळत आहे.
शहादा तालुक्यात एकूण १५० ग्रामपंचायतींचा समावेश आहे. गावागावात शौचालय बांधण्यात आले. असे असतानाही गावखेड्यात शौचालयाचा फारसा वापर होत नसल्याचे वास्तव आहे. ग्रामीण भागात कुठल्याही गावात प्रवेश करताना घाणीचे चित्र नजरेस पडते. नाकाला रूमाल लावूनच गावात प्रवेश करावा लागतो. ही बाब छोट्या गावातच नव्हे तर मोठ्या गावांमध्येही घाणीची समस्या पहायला मिळते. रस्त्याच्या दुतर्फा घाण केली जाते. गावे हागणदारीमुक्त व्हावीत म्हणून शासनाने निर्मल ग्राम योजना अनेक वर्षे राबविली. यासाठी गावागावात कलापथक, लघुपटाद्वारे जनजागृती केली गेली. परंतु आजची परिस्थिती पाहून ग्रामीण भागात हागणदारीमुक्तीचा फज्जा उडाला असल्याचे चित्र दिसून येत आहे.
साथरोग पसरण्याचा धोका
तालुक्यातील बहुतांश गावात उघड्यावर शौचास जाणे सुरूच आहे. यामुळे साथरोग पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही. घाणीने बरबटलेले रस्ते, प्रदूषित हवा आरोग्यास धोकादायक ठरू शकते. घरी शौचालय आहे. परंतु त्याचा नियमित वापर करणे, शौचालय स्वच्छ ठेवणे ही प्रत्येक सुजाण नागरिकांची सामाजिक जबाबदारी आहे. गाव परिसरातील नदीनाल्यांचे पाणी दूषित झाल्यास मानवी आरोग्यावर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात, याबाबत जनजागृती होणे आवश्यक आहे. तसेच गावातील सार्वजनिक ठिकाणी नियमितपणे निर्जंतुकीकरण करून, परिसर स्वच्छ ठेवणे गरजेचे आहे.