प्रतापपूरला उपसरपंचानंतर सरपंचाचाही झाला मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2021 04:32 IST2021-04-09T04:32:26+5:302021-04-09T04:32:26+5:30

प्रतापपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व येथील राणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी रोहिदास महारू पावरा (४५) यांना मधुमेहाचा त्रास जाणवत असल्याने ...

After Pratappur Deputy Sarpanch, Sarpanch also died | प्रतापपूरला उपसरपंचानंतर सरपंचाचाही झाला मृत्यू

प्रतापपूरला उपसरपंचानंतर सरपंचाचाही झाला मृत्यू

प्रतापपूर ग्रामपंचायतीचे सरपंच व येथील राणा प्रताप माध्यमिक विद्यालयाचे कर्मचारी रोहिदास महारू पावरा (४५) यांना मधुमेहाचा त्रास जाणवत असल्याने त्यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांना ७ एप्रिल रोजी तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र तेथे ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे पुढील उपचारासाठी नंदुरबार येथे जिल्हा रुग्णालयात रात्री ११ वाजता दाखल करण्यात आले. मात्र रात्री साडेबारा वाजताच्या सुमारास डॉक्टरांनी पावरा यांना मृत घोषित केले. त्यांच्यावर गुरुवारी दुपारी २ वाजता प्रतापपूर येथे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. पावरा २०१७ पासून ग्रामपंचायतीचे सरपंचपदी कार्यरत होते. सरपंच रोहिदास पावरा यांचे मोठे बंधू वेस्ता पावरा यांचेही सहा महिन्यांपूर्वी कोरोनाने निधन झाले आहे. वेस्ता पावरा हेही प्रतापपूरचे माजी सरपंच व जिल्हा परिषदेेचे माजी सदस्य होते.

प्रतापपूर ग्रामपंचायतीचे उपसरपंच लक्ष्मण नवल कोळी (५२) यांचे ५ एप्रिल रोजी कोरोनामुळे निधन झाले. ते ३० जून २०२० पासून उपसरपंचपदी कार्यरत होते. त्यांच्या पाठोपाठ सरपंच रोहिदास पावरा यांचाही मृत्यू झाल्याने गावात हळहळ व्यक्त होत आहे.

दोन्ही पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ जून २०२१ अखेर पूर्ण होणार होता. ग्रामपंचायत निवड प्रक्रिया जुलै २०२१ मध्ये होणार असून निवडणूक अधिकाऱ्यांनी तसा कार्यक्रमही जाहीर केला आहे.

Web Title: After Pratappur Deputy Sarpanch, Sarpanch also died