कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७५० मृतांची पोर्टलवर नोंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2021 04:32 IST2021-05-20T04:32:47+5:302021-05-20T04:32:47+5:30

नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोना बळींची संख्या वाढली आहे. गत दीड वर्षांपासून सुरू असलेल्या ...

750 deaths due to corona recorded on the portal | कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७५० मृतांची पोर्टलवर नोंद

कोरोनामुळे मृत्यू झालेल्या ७५० मृतांची पोर्टलवर नोंद

नंदुरबार : जिल्ह्यात पहिल्या लाटेच्या तुलनेत दुसऱ्या लाटेतील कोरोना बळींची संख्या वाढली आहे. गत दीड वर्षांपासून सुरू असलेल्या या महामारीमुळे जिल्ह्यात तब्बल ७५७ जणांचा मृत्यू झाला असून, या बळींची नोंद केंद्र शासनाच्या आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या पोर्टलवर झाली आहे. यासाठी जिल्ह्यात वाॅर रूम तयार करून नोंदण्या सुरू आहेत.

कोरोनाबाधितांना चांगले उपचार देण्यासाठी एकीकडे प्रयत्न होत असताना दुसरीकडे कोरोनामुळे उपचार सुरू असताना मृत झालेल्यांच्या मृत्यूच्या नोंदी केंद्र व राज्य सरकारच्या संकेतस्थळावर केल्या जात आहेत. यातून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची अचूक संख्या समोर येत आहे. यासाठी जिल्हा प्रशासनाने कक्षांची निर्मिती केली असून, याठिकाणी हे नोंदीचे कामकाज सुरू आहे. जिल्हा रुग्णालय, ग्रामीण व उपजिल्हा रुग्णालय तसेच खासगी कोविड रुग्णालयांमध्ये मृत झालेल्यांच्या नोंदी या ऑनलाईन पद्धतीने करून त्या जिल्हास्तरावर कक्षाला तातडीने कळवल्या गेल्याने जिल्ह्यातील मृतांची आकडेवारी कायम अपडेट राहिली आहे.

जिल्ह्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण हे शहरी भागात आढळून आले आहेत. यात नंदुरबार शहर व तालुक्याच्या काही भागात १५ हजार ६८९ रुग्ण आजवर समोर आले होते. यातील ३२७ जणांचा मृत्यू झाला होता. शहादा शहर व तालुक्यात एकूण ११ हजार ५७२ रुग्णांचा मृत्यू झाला होता. यातील १९१ जणांचा मृत्यू झाला. उर्वरित मृत्यू इतर चार तालुक्यांत झाले आहेत.

प्रशासनाची वाॅर रूम

जिल्हाधिकारी यांच्या सूचनेने जिल्हाधिकारी कार्यालयात वाॅर रूम तयार करण्यात आली आहे. याठिकाणी नियुक्त १० कर्मचारी सर्व माहिती देतात. त्यांच्याकडून मृतांच्या नोंदीचे कामकाज तातडीने होत आहे.

जि. प. कर्मचारी..

जिल्हा परिषदेकडून मृतांच्या नोंदी करण्यासाठी चार कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. हे कर्मचारी कोणत्याही रुग्णालयात किंवा आरोग्य केंद्रात कोरोनामुळे एखादी व्यक्ती मृत झाल्यास तातडीने नोंद करून घेत आहेत.

केंद्र आणि राज्य शासनाकडे नोंदी वेळेवर दिल्या जात आहेत. कोणत्याही प्रकारची तफावत जिल्ह्यात नाही. कोरोनामुळे जेवढे मृत्यू तेवढ्याच नोंदी करण्यावर भर दिला जात आहे. यासाठी कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत.

-डाॅ. एन. डी. बोडके,

जिल्हा आरोग्य अधिकारी, नंदुरबार. ­

...तर सुविधांवर परिणाम ­

जिल्हा प्रशासनाकडून कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची नोंदणी करणे अधिक गरजेचे आहे. या नोंदणीतून त्या-त्या भागातील कोरोनाची नेमकी स्थिती समोर येते. मृतांच्या संपर्कात आलेल्यांची यातून माहिती मिळते.

मृतांचा अंत्यविधी हा पालिका स्मशानभूमीत करणे आवश्यक असल्याने आधी नोंदणी करून मृताचा दाखला तयार करण्यात येत आहे. यातून वारसांना दाखला मिळण्याच्या अडचणी दूर होत आहेत.

जिल्हा आरोग्य विभाग, महसूल विभाग, ग्रामीण भागात ग्रामपंचायती तसेच आरोग्य विभाग यांच्याकडून संयुक्तपणे नोंदणी करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. हा डाटा राज्य शासनाकडेही दिला जातो.

Web Title: 750 deaths due to corona recorded on the portal