६६ शिक्षकांचा कोरोनाने राज्यात मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2021 04:33 IST2021-04-23T04:33:20+5:302021-04-23T04:33:20+5:30

नंदुरबार : राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च २०२० पासून कोविड १९ अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही पन्नास ...

66 teachers killed in Corona | ६६ शिक्षकांचा कोरोनाने राज्यात मृत्यू

६६ शिक्षकांचा कोरोनाने राज्यात मृत्यू

नंदुरबार : राज्यातील प्राथमिक शिक्षक मार्च २०२० पासून कोविड १९ अंतर्गत विविध सेवेत कार्यरत आहेत. आरोग्य कर्मचाऱ्यासोबत शिक्षकांनाही पन्नास लाखाचे विमा कवच शासनाने लागू केले आहे. या दरम्यान कोविड सेवेत असतांना मृत झालेल्या शिक्षकांच्या परिवाराला मात्र अद्याप क्लेम मिळाले नाही. अश्या राज्यातील ६६ पीडित शिक्षक परिवारांना त्वरित विम्याचे क्लेम देण्याची मागणी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक समितीच्या वतीने राज्य शासनाकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

कोविड सेवेत कार्यरत असताना राज्यातील अनेक शिक्षकांचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. शासनाची व जनतेची प्रामाणिकपणे सेवा करत असताना शिक्षकांना आपले प्राण गमवावे लागले आहे. आता कोविड क्लेम न मिळाल्यामुळे त्यांचे कुटुंबीय मात्र उघड्यावर पडले आहेत. शिक्षक वगळता इतर कर्मचाऱ्यांना मात्र क्लेम मिळाले आहेत हे विशेष. सर्वाधिक बाधित १०१ शिक्षक नागपूर जिल्ह्यातील आहेत. तर मृतांमध्ये सर्वाधिक १२ धुळे जिल्ह्यातील शिक्षकांचे झाले आहे. नगर तीन, अमरावती एक, औरंगाबाद चार, बीड एक, चंद्रपूर दोन, गडचिरोली एक गोंदिया तीन, जळगाव आठ, कोल्हापूर तीन,नागपूर चार, नांदेड चार, नंदुरबार पाच, नाशिक एक परभणी तीन, पुणे तीन, सोलापूर तीन ठाणे दोन, उस्मानाबाद एक, वर्धा तीन, यवतमाळ चार याप्रमाणे जिल्हावार मृत शिक्षकांची संख्या आहे. यापैकी कोणालाच ५० लाखाचा विमा क्लेम मिळालेला नाही असे त्यांच्या परिवाराच्या वतीने सांगण्यात आले आहे. तसेच याउपरही शिक्षकांची सेवा कोविडसाठी घेणे सुरूच आहे.

या संदर्भातील निवेदन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे व आरोग्य विभाग प्रधान सचिव गिरीश व्यास यांना महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, सरचिटणीस हरीश ससनकर यांनी दिले असल्याची माहिती नंदुरबार जिल्हाध्यक्ष पंकज भदाणे, सरचिटणीस रवींद्र अडगाळे, उपाध्यक्ष शांतीलाल धनगर यांनी दिली.

Web Title: 66 teachers killed in Corona