दुष्काळात पाणीप्रश्न मिटला; श्रमदानातून काटकळंबाची पाणीदार गावाकडे वाटचाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2019 14:31 IST2019-05-11T14:17:11+5:302019-05-11T14:31:32+5:30
ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे.

दुष्काळात पाणीप्रश्न मिटला; श्रमदानातून काटकळंबाची पाणीदार गावाकडे वाटचाल
- गोविंद शिंदे
बारुळ (जि़नांदेड) : कंधार तालुक्यातील सर्वाधिक दुष्काळी गाव म्हणून काटकळंबाची एकेकाळी ओळख होती़ अनेक वर्षे तीव्र पाणीटंचाईच्या झळा सोसलेल्या या गावाने श्रमदानातून जलसंधारणाचे काम हाती घेतले आणि बघता बघता पाणीदार गावाकडे वाटचाल सुरू झाली आहे़ सध्या कंधार तालुक्यातील अनेक गावांना टंचाईच्या झळा सोसाव्या लागत असताना काटकळंबावासीय मात्र पाण्याबाबत निर्धास्त आहेत़
मानार धरणाच्या शेजारी अवघ्या चार कि़मी़ अंतरावरील हे गाव. धरणाशेजारी असूनही दर उन्हाळ्यात ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत असे़ टँकरग्रस्त गाव अशीच या गावाची ओळख निर्माण झाली होती़ शेजारील उमरा येथील एका संस्थेत सहशिक्षक म्हणून कार्यरत असलेले गावचे भूमीपूत्र बाबुराव बस्वदे गुरुजी यांनी यातून मार्ग काढण्याचा निश्चय केला़ २०११ मध्ये अण्णा हजारे यांच्या राळेगाणसिद्धीला गावातील काही जणांसोबत भेट दिली आणि तेथे जलसंधारणाचे काम कशा पद्धतीने झाले, याची माहिती घेतली़ पुढे २०१२ मध्ये काटकळंबा पाणीदार गाव करण्याचा संकल्प गावाने केला़
सुरुवातीला ग्रामस्वच्छता, नालीसफाई आदी उपक्रम लोकसहभागातून राबविण्यात आले़ यामुळे गावात एकोपा निर्माण झाला़ क्षारयुक्त पाणी पिवून ग्रामस्थ आजारी पडत असल्याचे लक्षात आल्यानंतर गुरुजींनी शुद्ध पाणीपुरवठ्यासाठी संस्कृती संवर्धन मंडळ सगरोळीच्या माध्यमातून आंध्रप्रदेशातील बालविकास संस्थेकडे पाठपुरावा केला़ त्यातून जलशुद्धीकरण प्रकल्प मंजूर करून घेतला़ २०१५ मध्ये या गावाला तीव्र पाणीटंचाईचा फटका सोसावा लागला़ यानंतर ग्रामस्थांनी जलसंधारणाच्या कामाला आणखी गती दिली़
नेकमे काय केले?
२०१६ ते २०१८ या कालावधीत संस्कृती संवर्धन संस्थेच्या माध्यमातून नाला खोलीकरण व रुंदीकरण (डोह मॉडेल) काम हाती घेण्यात आले़ केअरींग फ्रेंडस्, नाम फाऊंडेशन व राज्य शासनाच्या सहकार्याने गाव परिसरात ६ कि़मी़च्या नाल्याचे डोह पद्धतीने खोदकाम करण्यात आले़ या बरोबरच जलदूत प्रकल्पही राबविण्यात आला़ शिवारातील ५० एकर पडीक जमिनीवर कृषी विभागाच्या माध्यमातून खोल सलग समतल चराचे काम पूर्ण करण्यात आले़ काही बांध बंधिस्तीची कामेही पूर्ण झाली़ त्यानंतर शेततळी, गांडूळ खत युनिट आदींवर लक्ष केंद्रीत करण्यात आले़ रोगराई टाळण्यासाठी व वैयक्तिक स्वच्छतेसाठी गाव पाणंदमुक्त झाले़ सिंचन विभागाकडून चार सिमेंट बंधारेही बांधून घेण्यात आले़ एकूणच काटकळंबा शिवारातील १५ टक्के शिवारात मृद व जलसंधारणाची कामे शास्त्रशुद्ध पद्धतीने पूर्ण करण्यात आल्याने पावसाचे पाणी जमिनीत मुरण्यास मदत झाली़
टँकरमुक्त गाव
आजघडीला कंधार आणि शेजारच्या लोहा तालुक्यातील अनेक गावे पाणीटंचाईने व्याकुळ असताना काटकळंबावासियांना मात्र पुरेसे पाणी उपलब्ध आहे़ एकेकाळी टँकरयुक्त अशी ओळख झालेल्या या गावाने जलसंधारणाच्या कामाद्वारे टँकरमुक्त अशी नवी ओळख प्राप्त केली आहे़
अवघ्या २५ फुटांवर पाणी उपलब्ध
बाबुराव बस्वदे गुरुजी यांनी गावशिवारातील मृद व जलसंधारणाची कामे पूर्ण झाल्याशिवाय पायात चप्पल न घालण्याची प्रतीज्ञा केली. गावचे भूमीपूत्र तथा मिराभार्इंदर मनपाचे उपायुक्त डॉ़संभाजीराव पानपट्टे यांनीही गुरुजींना मोलाची साथ दिली़ केअरींग फे्रंडस्सह शासकीय विभाग आणि इतरांशी समन्वय साधण्याचे काम सगरोळीच्या संस्कृती संवर्धन मंडळाचे अध्यक्ष प्रमोद देशमुख यांनी केले़ त्यामुळेच गावाचा चेहरामोहरा बदलला. सद्यस्थितीत ऐन उन्हाळ्यात या गावात २० ते २५ फुटांवर पाणी उपलब्ध आहे.