निजामाबादमध्ये भीषण अपघातात नांदेडमधील दोघे भाऊ, भाऊजीसह अन्य एकाचा मृत्यू
By हितेंद्र.सिताराम.काळुंखे | Updated: March 13, 2023 18:47 IST2023-03-13T18:47:43+5:302023-03-13T18:47:56+5:30
कुंडलवाडी येथील निरडी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे

निजामाबादमध्ये भीषण अपघातात नांदेडमधील दोघे भाऊ, भाऊजीसह अन्य एकाचा मृत्यू
कुंडलवाडी/ बिलोली (जि. नांदेड): निजामाबाद जिल्ह्यातील राष्ट्रीय महामार्ग ४४ वर रविवारी (दि.१२) कार आणि कंटनेरच्या भीषण अपघातात चार जण ठार झाले. इंदलवाई मंडळातील चंद्रायनपल्ली येथे मध्यरात्री भरधाव कारने कंटेनरला धडक दिल्याने चार जणांना आपला जीव गमवावा लागला. मयतांमध्ये कुंडलवाडी येथील तिघे असून पैकी दोघे भाऊ आहेत.
या घटनेने कुंडलवाडीत शोककळा पसरली असून कुंडलवाडी येथील निरडी परिवारातील दोन सख्खे भाऊ गणेश हणमंलु निरडी, आदित्य हणमंलु निरडी तसेच निरडी परिवाराचा जावई प्रकाश सायबू अंकलवार हे तिघे तर निजामाबाद येथील रहिवासी साईराम भाळे अशी मृतांची नावे आहेत. सर्व मयत हे २५ ते ३० च्या वयोगटातील होते.
या घटनेची माहिती कळताच मयताच्या नातेवाईक निजामाबाद येथील शासकीय रुग्णालयात धाव घेतली. तेथे शवविच्छेदन करण्यात आले व त्यांच्या कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले. तरुण मुलांचा अपघातातमृत्यू झाल्याने कुंडलवाली शहरावर शोककळा पसरली आहे. सदरील निरडी बंधू मोबाइल शॉपीचा व्यवसाय करत होते, तर वडील सेवानिवृत्त मुख्याध्यापक आहेत. मयत प्रकाश हा शेळीपालनाचा व्यवसाय करायचा. हे तिघेही खरेदीच्या निमित्ताने ते हैदराबाद येथे गेले होते.