लागवडीस तयार रोपांची चोरी; जगण्याच्या 'आशेवरच' डल्ला मारल्याने शेतकरी हतबल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 15, 2021 16:04 IST2021-07-15T16:03:06+5:302021-07-15T16:04:26+5:30
Theft of seedlings ready for planting in Nanded : या घटनेनंतर अनेक शेतकरी थेट शेतात रात्रीचा मुक्काम करत असल्याचे चित्र आहे.

लागवडीस तयार रोपांची चोरी; जगण्याच्या 'आशेवरच' डल्ला मारल्याने शेतकरी हतबल
अर्धापूर ( नांदेड ) : लागवडीस तयार रोपांची शेतातून चोरी झाल्याची धक्कादायक घटना तालुक्यातील पिंपळगाव ( महादेव) शिवारात सोमवारी उघडकीस आली आहे. मोठ्या मेहनतीने लागवड आणि विर्कीसाठी तयार केलेली झेंडू, टोमटो आदी रोपांसोबत खत, विविध बियाणांवर चोरट्यांनी डल्ला मारला आहे. कोरोना काळातील नुकसानीनंतर आता यातून काही प्रमाणात उत्पन्न मिळण्याची आशा सुद्धा माळवल्याच्या भावना शेतकरी कैलास कल्याणकर हतबलतेने व्यक्त केल्या. या घटनेनंतर परिसरातील शेतकरी सावध झाले असून रात्रीच गस्त सुरु केली आहे.
तालुक्यातील पिंपळगाव ( म.) शिवारात गट क्रमांक २१४ येथे कैलास कल्याणकर यांचे शेत आहे .त्यांनी लागवड आणि विर्कीसाठी स्वतःच्या शेतात नर्सरी सुरु केली आहे. मोठ्या मेहनतीने झेंडू, टमाटे आदी रोपे त्यांनी तयार केली आहेत. आता हंगाम असल्याने लागवड योग्य रोपांची शेतकऱ्यांमधून मागणी वाढली आहे. हीच संधी साधून चोरट्यांनी सोमवारी १२ जुलैच्या रात्री कल्याणकर शेतात नसताना रोपांची चोरी केली. चोरट्यांनी खत, विविध बियाणेसुद्धा लंपास केली.
बुधवारी सकाळी शेतात गेल्यास कल्याणकर यांच्या निदर्शनास हा प्रकार आला. त्यांनी लागलीच याची माहिती पोलिसांनी दिली. या घटनेने परिसरातील शेतकरी चांगलेच धास्तावलेले आहेत. रोपांच्या राखणीसाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. अनेक शेतकरी थेट शेतात रात्रीचा मुक्काम करत असल्याचे चित्र आहे. कोरोना काळात मागणी नसल्याने अनेक रोपटे उपटून फेकावी लागली. यामुळे मोठे नुकसान झाले होते. यावर्षी अधिक मेहनत घेऊन रोपांची जोपासना केली. लागवडीस योग्य रोपांना किंमत चांगली मिळत होती. यातून मागच्या वर्षीचे नुकसान भरून निघून भविष्य सुखकारक होण्याची आशा होती अशा भावना शेतकरी कल्याणकर यांनी व्यक्त केल्या आहेत.