शेतकरीपुत्राचा आदर्श! सरकारी नोकरीची पहिली कमाई विठ्ठल चरणी; गावात उभारणार सभामंडप!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 17, 2025 15:45 IST2025-10-17T15:40:22+5:302025-10-17T15:45:02+5:30
यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही राहुल कदम आपल्या मातीची आणि गावाची नाळ विसरले नाहीत.

शेतकरीपुत्राचा आदर्श! सरकारी नोकरीची पहिली कमाई विठ्ठल चरणी; गावात उभारणार सभामंडप!
- शरद वाघमारे
मालेगाव ( जि. नांदेड) : अत्यंत बिकट आर्थिक परिस्थितीतून, जिद्द आणि कठोर परिश्रमाच्या बळावर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची (MPSC) परीक्षा उत्तीर्ण होऊन मंत्रालयात वर्ग-२ ची नोकरी मिळवलेल्या एका शेतकरीपुत्राने सामाजिक बांधिलकीचे एक अनोखे उदाहरण समोर ठेवले आहे. अर्धापूर तालुक्यातील देगाव कु येथील राहुल सुदामराव कदम यांनी आपल्या पहिल्या महिन्याचा संपूर्ण पगार गावातील विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक सभा मंडपाच्या बांधकामासाठी अर्पण करून एक नवा आदर्श घालून दिला आहे.
मोजकी शेती आणि घरची हलाखीची परिस्थिती असूनही राहुल कदम यांनी शिक्षणाकडे दुर्लक्ष केले नाही. त्यांच्या या मेहनतीचे फळ त्यांना नुकतेच मिळाले. काही दिवसांपूर्वीच त्यांची मुंबई येथील मंत्रालयात मतदान विभागात स्टेनोग्राफर, वर्ग २ या पदावर नियुक्ती झाली. यशाच्या शिखरावर पोहोचल्यावरही राहुल कदम आपल्या मातीची आणि गावाची नाळ विसरले नाहीत.
गावातील सामाजिक कार्याला हातभार
देगाव कु येथे सध्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचा जीर्णोद्धार आणि सांस्कृतिक सभामंडपाचे काम सुरू आहे. या कामासाठी गावकरी मोठ्या प्रमाणात देणगी देत आहेत. या सामाजिक कार्यात आपलेही योगदान असावे या उदात्त भावनेतून राहुल कदम यांनी आपल्या नोकरीतील पहिला-वहिला पगार गावातील ज्येष्ठ नागरिक आणि गावकऱ्यांच्या समक्ष नुकताच विठ्ठल रुक्मिणी यांच्या चरणी अर्पण केला. गावात उभे राहत असलेले हे सांस्कृतिक सभामंडप गोरगरीब कुटुंबातील विवाह सोहळे आणि इतर सार्वजनिक कार्यक्रमांसाठी अत्यंत उपयोगी ठरणार आहे.
माझा खारीचा वाटा
नोकरी लागल्यानंतर पहिला पगार स्वतःच्या गरजांसाठी न वापरता, गावातील समाजोपयोगी कामासाठी देण्याचा राहुल कदम यांचा हा निर्णय खरोखरच प्रेरणादायी आहे. त्यांच्या या सामाजिक बांधिलकीचे आणि मोठ्या मनाचे गावातून तसेच पंचक्रोशीतून सर्वत्र कौतुक होत आहे. संघर्षातून मिळालेले यश समाजकार्यासाठी वापरणाऱ्या या शेतकरीपुत्राने इतरांसाठीही एक दीपस्तंभ उभा केला आहे. याबाबत बोलताना कदम म्हणाले की, "गावात उभारण्यात येत असलेले सांस्कृतिक सभामंडप गोरगरिबांचे लग्न आणि इतर कार्यक्रमांसाठी उपयुक्त ठरेल. या कामात आपलेही योगदान असावे या भावनेतून मदत करण्याचा निर्णय घेतला. मी खारीचा वाटा देऊ शकलो याचा खूप आनंद आहे."