मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2025 18:45 IST2025-07-07T18:43:32+5:302025-07-07T18:45:27+5:30
पहिल्या अपघातात डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली, परंतु काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले.

मुलगी पसंत, सोयरीक ठरणार होती...पण आदल्या दिवशी दुहेरी अपघातात तरुणाचा मृत्यू!
हदगाव (नांदेड) : तालुक्यातील कवठा येथील गजानन मंदिराजवळ एका तरुणाचा दुहेरी अपघातात दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली. मयत तरुण आशिष विजयराव देशमुख (वय ३१) हे मूळचे वाशिम जिल्ह्यातील रिसोड तालुक्यातील लिंगापूर कोतवाल येथील रहिवासी होते. सध्या ते हदगाव तालुक्यातील निवघा येथील आयडीबीआय बँकेत असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत होते.
५ जुलै रोजी सायंकाळी साडेआठ ते नऊच्या दरम्यान, ते बुलेट (क्र. एमएच ३७ एजी ५९५९) वरून निवघा येथून हदगावकडे जाताना, गजानन मंदिर, कवठासमोर अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यामुळे ते रस्त्यावर पडले. डोक्यावर हेल्मेट असल्यामुळे गंभीर दुखापत टळली असती, परंतु त्या अपघातातून सावरायच्या आत, काही क्षणात दुसरे एक भरधाव वाहन त्यांच्या अंगावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर त्यांना तातडीने दवाखान्यात नेण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांना मृत घोषित केले. सुमित चौरे, पप्पू जाधव, दत्ता जाधव आणि त्रिभुवन चव्हाण यांनी अपघाताची माहिती दिली.
आनंदाचा दिवस दु:खात बदलला
६ जुलै रोजी त्यांच्या सोयरीकीचा दिवस ठरलेला होता. आशिष यांना पसंतीची मुलगी लाभली होती. कुटुंबीयांनी त्याच दिवशी सोयरीक निश्चित केली होती. मात्र, नियतीच्या विचित्र खेळात, आनंदाचा दिवस दु:खात बदलला. त्यांच्या पश्चात आई, चार काका, सहा भाऊ, बहिणी असे मोठे एकत्रित कुटुंब आहे. त्यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालय, हदगाव येथून त्यांच्या नातेवाइकांनी ताब्यात घेतले.