बापानेच चार वर्षीय पोराला पोत्यात बांधून फेकले नदीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 2, 2022 10:36 IST2022-04-02T10:35:33+5:302022-04-02T10:36:53+5:30

नांदेडमधील घटना; अनैतिक संबंधातून मूल जन्माला आल्याचा होता संशय; मुलाचा मृतदेहच लागला हाती

The father tied the four-year-old boy in a sack and threw him into the river | बापानेच चार वर्षीय पोराला पोत्यात बांधून फेकले नदीत

बापानेच चार वर्षीय पोराला पोत्यात बांधून फेकले नदीत

लोकमत न्यूज नेटवर्क   
कंधार (जि. नांदेड) : पत्नीच्या अनैतिक संबंधातून मूल जन्माला आले, असा संशय पित्याला होता. यातूनच त्याने चार वर्षीय मुलाला पोत्यात बांधून गोदावरी नदीच्या पात्रात फेकून दिल्याची घटना गुरुवारी उघडकीस आली. या प्रकरणी कंधार पोलिसांनी आरोपी पित्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.    
माधवराव देव्हारे  असे आरोपीचे नाव असून, अभिषेक देव्हारे असे मृताचे नाव आहे. २८ मार्चला अभिषेक  शाळेतून घरी परत न आल्याने २९ रोजी आई व नातेवाइकांनी कंधार पोलीस ठाणे गाठून तक्रार दिली. पोलीस निरीक्षक पडवळ, उपनिरीक्षक ईंद्राळे, आदी नारनाळी (ता. कंधार) येथे पोहोचले व त्यांनी चौकशी केली. चौकशीत माधव हा उडवाउडवीचे उत्तरे देत असल्याने पोलिसांना त्याच्यावर संशय आला. पोलिसी खाक्या दाखवताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.    

आरोपी माधव देव्हारे याला दोन मुले आहेत. तो दारूच्या नशेत पत्नीसोबत नेहमी भांडण करायचा. पत्नीवरील संशयातून तो नेहमीच लहान मुलगा माझा नाही, असे सांगायचा. २८ रोजी मुलगा अभिषेकला  पोत्यात बांधून त्याने नायगाव तालुक्यातील राहेर येथील गोदावरी नदीच्या पुलावरून फेकून दिल्याचे पोलिसांना सांगितले. पोलिसांनी तपास केला असता  ३० मार्चला अभिषेकचा मृतदेह धर्माबाद तालुक्यातील येलापूर शिवारात गोदावरी नदी काठावर पोत्यात बांधलेला पाण्यावर तरंगताना आढळला.  पोलिसांनी उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात दिला. याप्रकरणी आरोपी माधव देव्हारे यांच्याविरुद्ध कंधार पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

Web Title: The father tied the four-year-old boy in a sack and threw him into the river