उमरीत पिसाळलेल्या वानराची दहशत; प्रशिक्षण बंद, बंदोबस्तासाठी आलेला वन कर्मचारी जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 19:20 IST2025-07-12T19:19:37+5:302025-07-12T19:20:11+5:30
एका वानरामुळे ७५ शिक्षकांचे प्रशिक्षण अर्ध्यावर बंद पडले, प्रशिक्षण नांदेडला हलवावे लागले आहे

उमरीत पिसाळलेल्या वानराची दहशत; प्रशिक्षण बंद, बंदोबस्तासाठी आलेला वन कर्मचारी जखमी
उमरी (नांदेड) : उमरी तालुक्यात एक पिसाळलेला वानर चक्क प्रशासन आणि वनविभागाच्या यंत्रणेलाही सळो की पळो करून सोडतो आहे. एका वानरामुळे ७५ शिक्षकांचे प्रशिक्षण अर्ध्यावर बंद पडले, प्रशिक्षण नांदेडला हलवावे लागले, तर बंदोबस्तासाठी आलेल्या वन कर्मचाऱ्यावरच वानराने चावा घेतला. या घटनांमुळे उमरी शहरात भीतीचे वातावरण पसरले असून वनविभागाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
९ जुलै रोजी उमरी येथील तहसील कार्यालयातील सभागृहात बाललैंगिक शिक्षण या विषयावर शिक्षकांचे सहा दिवसांचे प्रशिक्षण सुरू होते. मुंबई येथून आलेल्या तीन प्रशिक्षकांपैकी एका ट्रेनरवर व त्याच्या वाहनचालकावर वानराने अचानक हल्ला केला. वाहनचालकाला चावा घेतल्याने दोघांनाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उमरीच्या ग्रामीण रुग्णालयात रेबीजच्या लसी उपलब्ध नसल्याने त्यांना नांदेडला हलवावे लागले. त्यामुळे पुढील सर्व प्रशिक्षण नांदेड येथे घेण्यात आले, आणि ७५ शिक्षकांचा वेळ आणि प्रवास दोन्ही वाया गेला.
याच दरम्यान वानराने संत दासगणू आश्रमशाळेजवळही उच्छाद मांडला. विद्यार्थ्यांच्या खोल्यांबाहेर धिंगाणा घालून त्यांना भयभीत केले. ही बाब वनविभागाच्या लक्षात आली, पण त्यांच्याकडून प्रत्यक्ष कारवाई करण्याऐवजी केवळ दोन वॉचमनना पाठवून विषय हाताळण्याचा प्रयत्न झाला. शनिवारी सायंकाळी ही निष्काळजीपणाची किंमत वनकर्मचारी शाहूजी शिंदे यांना चुकवावी लागली. वानराला झुडपांतून हुसकावण्याचा प्रयत्न करत असताना वानराने त्यांच्या चेहऱ्यावर, डोळ्याजवळ चावा घेतला. रक्तबंबाळ अवस्थेत शिंदे यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाळेतील विद्यार्थी आणि कर्मचारीही या घटनेने हादरले.
या वानराच्या उपद्रवामुळे उमरी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिक आणि कर्मचारी जीव मुठीत धरून काम करत आहेत. वनविभागाकडून अद्यापही पिसाळलेल्या वानराच्या कायमस्वरूपी बंदोबस्तासाठी आवश्यक ती साधने, प्रशिक्षित कर्मचारी किंवा प्रभावी कारवाई दिसून येत नाही. नागरिकांतून आता एकच मागणी होत आहे "या वानराचा कायमस्वरूपी बंदोबस्त करा, अन्यथा आणखी एखादा मोठा अनर्थ घडू शकतो."