उमरी तालुक्यात अंगणवाडीला निकृष्ट गुळाचा पुरवठा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 11, 2018 20:09 IST2018-12-11T20:08:40+5:302018-12-11T20:09:52+5:30
अंगणवाडीसाठी बालकांच्या पोषण आहाराचा गुळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले.

उमरी तालुक्यात अंगणवाडीला निकृष्ट गुळाचा पुरवठा
उमरी (नांदेड ) : तालुक्यातील एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागाअंतर्गत अंगणवाडीसाठी बालकांच्या पोषण आहाराचा गुळ निकृष्ट दर्जाचा असल्याचे निदर्शनास आले. याप्रकरणी जि. प. सदस्या ललिता यलमगोंडे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे तक्रार केली असून हा मुद्दा बैठकीत आगामी बैठकीत मांडणार असल्याची माहिती दिली.
एकात्मिक बालविकास प्रकल्प विभागांतर्गत अंगणवाडीसाठी बालकांच्या पोषण आहारासाठी गुळाचा पुरवठा करण्यात येतो. तळेगाव येथे आज अत्यंत निकृष्ट दर्जाचा व काळ्या रंगाचा गुळ आल्याचे निदर्शनास आले. यासंदर्भात जि.प. सदस्या यलमगोंडे यांनी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अशोक शिंगणे यांना दूरध्वनीवरून माहिती दिली. शिंगणे यांनी खराब गुळ परत घेऊन चांगल्या प्रतीचा गुळ देण्यात येणार असल्याचे सांगितले. बाल विकास प्रकल्पाचे विस्ताराधिकारी जाधव यांनी तळेगाव येथे अंगणवाडीतील या गुळाचा पंचनामा केला. याप्रकरणी संबंधित अधिकारी व ठेकेदारांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी यलमगोंडे यांनी केली आहे.