Starting schools in the changing sunlight today | रणरणत्या उन्हात आजपासून शाळांना प्रारंभ
रणरणत्या उन्हात आजपासून शाळांना प्रारंभ

ठळक मुद्देपाणीटंचाईच्या झळा कायम चार दिवसांपासून तापमानाचा पारा ४२ अंशांवर स्थिर पाण्यासाठी भटकंती सुरूच

नांदेड : तापमानाचा पारा अद्यापही चाळीशीच्या पार असून रणरणत्या उन्हातच १७ जूनपासून जिल्ह्यातील शाळांना प्रारंभ होणार आहे. नांदेड शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पाणीटंचाईच्या झळा कायम आहेत. मृग नक्षत्र सुरू होवून आठ दिवस संपले तरीही पावसाची प्रतीक्षा कायम आहे. अशा या दुष्काळी वातावरणात शाळांना प्रारंभ होणार आहे. विशेष म्हणजे, या दुष्काळी परिस्थितीत सुरू होणाऱ्या शाळांबाबत जिल्ह्यातील एकाही पदाधिकारी अथवा लोकप्रतिनिधीने आवाज उठवला नाही, हे विशेष!
जिल्ह्यात १७ जून रोजी शाळांना सुरुवात होत आहे. जिल्हा परिषदेच्या २ हजार २३९ शाळा तर पहिली ते बारावीपर्यंतच्या संपूर्ण शाळांची संख्या ३ हजार ७७६ इतकी आहे. या शाळांना १७ जून रोजी प्रारंभ होत आहे. जवळपास १२ लाख विद्यार्थी शाळांमध्ये पोहोचणार आहेत. त्यातच पहिलीच्या प्रवेशालाही प्रारंभ होणार आहे. जवळपास १५ दिवस पटनोंदणी चालणार आहे. शाळाबाह्य विद्यार्थ्यांचाही १७ जूनपासून शोध घेतला जाणार आहे. या सर्व बाबी शैक्षणिक वातावरण निर्मितीसाठी केल्या जाणार असल्या तरीही दुष्काळी परिस्थितीचा मोठा अडसर या सर्व बाबींपुढे राहणार आहे. पाणीटंचाईची तीव्रता अद्यापही वाढतच आहे. जिल्ह्यातील टँकरची संख्या १४० वर पोहोचली आहे. मुखेड तालुक्यात सर्वाधिक टँकर सुरू आहेत. मागील चार दिवसांपासून जिल्ह्यात तापमानाचा पारा ४२ अंशावर कायम आहे.
जिल्ह्यातील शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी शिक्षक संघटनांनी केली आहे. मात्र या मागणीला प्रशासनाकडून अद्याप तरी प्रतिसाद मिळाला नाही. सुट्या वाढविण्याची मागणीही करण्यात आली होती. मात्र हा निर्णय शासनस्तरावरुन घेणे आवश्यक असल्याचे सांगत जिल्हा परिषदेने अंग काढून घेतले. या सर्व बाबींचा फटका १७ जूनपासून सुरू होणा-या शाळांना बसणार आहे.
ग्रामीण भागात अद्यापही महिला-मुले पाण्यासाठी भटकंती करीत आहेत. या परिस्थितीत शाळा सुरू होणे अडचणीचे ठरणार आहे. राज्य शासनाने दुष्काळी भागात शाळा-महाविद्यालयांना टँकरने पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. मुलांना पिण्यासाठी पाणी उपलब्ध व्हावे यासाठी सरकारने टंचाईसदृश्य उपाययोजनेत शाळांनाही टँकरने पाणी देण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यात टँकरची परिस्थिती पाहता ग्रामीण भागात अनेक गावांमध्ये टँकर उपलब्ध करुन देण्याचे आदेश दिल्यानंतरही टँकर उपलब्ध होत नसल्याची तक्रारी आल्या आहेत. त्यातच आता पाण्याचे स्त्रोतही बंद झाले आहेत. त्यामुळे शाळांना पाणीपुरवठा करायचा कुठून? हा प्रश्नही प्रशासनापुढे उभा टाकला आहे. अशा परिस्थितीत पाणी आणायचे कोठून? हा प्रश्न पुढे आला आहे. विदर्भात पाण्याच्या टंचाईमुळे २६ जूनपासून शाळा सुरू होतात. नांदेड जिल्ह्यात यावर्षी भीषण परिस्थिती निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील एकाही लोकप्रतिनिधीने याबाबत ‘ब्र’ ही काढला नाही.
आरटीईची दुसरी प्रवेश फेरी आज

  • बालकांचा शिक्षण हक्क कायद्यांतर्गत जिल्ह्यात आर्थिकदृष्ट्या दुर्बल प्रवर्गातील ३ हजार २४८ विद्यार्थ्यांना मोफत प्रवेश दिला जाणार आहे. या प्रवेशाची पहिली फेरी पूर्ण झाली असून पहिल्या फेरीत १ हजार ६४४ विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात आला आहे. दुसºया फेरीतील सोडत १७ जून रोजी होणार आहे. दुसºया फेरीत १ हजार ५० विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहे. याबाबत पालकांना मेसेज दिले जाणार असून प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.
  • जिल्ह्यातील शाळामध्ये प्रवेश घेणाºया मुलांचे पहिल्याच दिवशी पुष्प देवून स्वागत केले जाणार आहे. जिल्हा परिषदेचे अधिकारी, पदाधिकारी, क्षेत्रीय अधिकारी, शिक्षण विस्तार अधिकारी, गटशिक्षणाधिकारी हे आपआपल्या भागातील शाळांना भेटी देवून विद्यार्थ्यांचे स्वागत करणार आहेत.

Web Title: Starting schools in the changing sunlight today
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.