उभ्या उसाला लावली आग! अर्धापूरमध्ये कारखान्याच्या दिरंगाईमुळे हतबल शेतकऱ्याचा संताप
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2026 12:22 IST2026-02-18T12:20:30+5:302026-02-18T12:22:13+5:30
कारखान्याचे उंबरठे झिजवूनही तोड मिळाली नाही! अखेर संतापाच्या भरात दरेगावच्या शेतकऱ्याने उभ्या उसाला लावली आग; व्हिडिओ पाहून येईल डोळ्यात पाणी

उभ्या उसाला लावली आग! अर्धापूरमध्ये कारखान्याच्या दिरंगाईमुळे हतबल शेतकऱ्याचा संताप
नांदेड : कष्टाने पिकवलेला शेतीमाल विकण्यासाठी कारखान्याचे उंबरठे झिजवण्याची वेळ आल्यावर शेतकरी किती टोकाचा निर्णय घेऊ शकतो, याचा धक्कादायक प्रकार अर्धापूर तालुक्यात समोर आला आहे. वेळेवर उसाची तोडणी न झाल्याने हतबल झालेल्या दरेगाव येथील गंगाधर भीमराव हंबर्डे या शेतकऱ्याने मंगळवारी दुपारी आपल्या स्वतःच्या एक हेक्टरवरील उसाला आग लावून दिली.
नेमकी काय आहे व्यथा?
हंबर्डे यांनी दरेगाव शिवारात वर्षभर मेहनत करून उसाची लागवड केली होती. फेब्रुवारी महिना संपत आला तरी उसाची तोडणी झाली नव्हती. आपला ऊस कारखान्याला जावा, यासाठी त्यांनी 'भाऊराव सहकारी साखर कारखाना' प्रशासनाकडे वारंवार फेऱ्या मारल्या. ऊसतोड टोळ्यांनाही वारंवार विनंती केली, मात्र त्यांना फक्त आश्वासनेच मिळाली.
स्वप्नांची झाली राख
उसाचा हंगाम संपत आला असूनही कारखाना प्रशासनाकडून प्रतिसाद मिळत नसल्याने हंबर्डे प्रचंड नैराश्यात होते. शेवटी, मंगळवारी दुपारच्या सुमारास संतापाच्या भरात त्यांनी उभ्या पिकाला आग लावून दिली. बघता बघता वर्षभराची मेहनत आणि उदरनिर्वाहाचे साधन आगीच्या भक्षस्थानी पडले.
शेतकऱ्याने जगायचे कसे?
"शेतीमालाला भाव मिळत नाही आणि तोडणीसाठी चपला झिजवाव्या लागतात, अशा परिस्थितीत शेतकऱ्याने जगायचे कसे?" असा आर्त सवाल हंबर्डे यांनी यावेळी उपस्थित केला. या घटनेमुळे नांदेड जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या पुन्हा एकदा ऐरणीवर आल्या असून, साखर कारखान्यांच्या नियोजनावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.