ssc exam : नांदेडमध्ये मराठीच्या पेपरला ७७३ विद्यार्थ्यांची दांडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2020 19:43 IST2020-03-04T19:42:53+5:302020-03-04T19:43:15+5:30
नांदेड जिल्ह्यात कॉपीचे एकही प्रकरण आले नाही पुढे

ssc exam : नांदेडमध्ये मराठीच्या पेपरला ७७३ विद्यार्थ्यांची दांडी
नांदेड : मंगळवारी दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून मराठीच्या पेपरला ७७३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली आहे़ जिल्ह्यातील १५७ परीक्षा केंद्रांवर आज पहिला पेपर घेण्यात आला़विशेष म्हणजे, कॉपीचे एकही प्रकरण समोर आले नाही़
जिल्ह्यात बारावीच्या परीक्षेत कॉपीमुक्ती अभियानाचा फज्जा उडाला़ पन्नासहून अधिक कॉपीबहाद्दरांना भरारी पथकाने पकडले आहे़ मुखेडमध्ये तर व्हॉट्सअॅपवर प्रश्नपत्रिका व्हायरल झाली होती़ त्यामध्ये गुन्हेही नोंदविण्यात आले होते़ परंतु, त्यानंतरही जिल्ह्यातील काही सेंटरवर कॉप्यांचा सुळसुळाट होता़ त्यातच मंगळवारी दहावीच्या परीक्षेला सुरुवात झाली़ १५७ केंद्रांवर मंगळवारी मराठीचा पहिला पेपर घेण्यात आला़ ४७ हजार ६७ विद्यार्थ्यांनी त्यासाठी नोंदणी केली होती़
परंतु पहिल्याच दिवशी ७७३ विद्यार्थ्यांनी दांडी मारली असून ४६ हजार २९४ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली़ दरम्यान, कॉपीचा प्रकार कुठेही पुढे आला नाही़ कॉपीमुक्तीसाठी परीक्षा केंद्रावर बैठे पथक आणि भरारी पथकांची नेमणूक करण्यात आली होती़ तसेच परीक्षा केंद्र परिसरात फिरणाऱ्यांवरही पोलिसांमुळे वचक बसला होता़ दरम्यान, परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांनी अतिरिक्त साहित्य घेवून येवू नये, असे आवाहन शिक्षण विभागाने केले आहे़
विद्यार्थ्यांना बूट काढावे लागले बाहेर
शहरातील परीक्षा केंद्रावर सकाळपासून विद्यार्थी आणि पालकांची मोठी गर्दी जमली होती़ पेपर सुरु होण्यापूर्वी अर्धा तास अगोदर परीक्षा केंद्रात पोहोचण्याच्या सूचना विद्यार्थ्यांना देण्यात आल्या होत्या़ परीक्षा हॉलमध्ये प्रवेश करण्यापूर्वीच विद्यार्थ्यांची कसून तपासणी करण्यात आली़ तसेच बूट आणि मोजेही परीक्षा केंद्राबाहेरच काढण्यास सांगण्यात आले़विद्यार्थ्यांनी सोबत आणलेले कंपास आणि इतर साहित्यही हॉलबाहेरच ठेवण्यात आले होतेक़ेंद्राबाहेरही चोख बंदोबस्त होता़