प्लॅटफॉर्मवरून ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळला; मुदखेड रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2025 18:23 IST2025-05-29T18:22:28+5:302025-05-29T18:23:04+5:30

मुदखेड रेल्वे स्थानकात थरार; प्रशासनाने प्रसंगावधान राखलं, मोठा अनर्थ टळला

Shocking! Tractor falls directly from platform onto tracks; Incident at Mudkhed railway station | प्लॅटफॉर्मवरून ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळला; मुदखेड रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

प्लॅटफॉर्मवरून ट्रॅक्टर थेट रुळावर कोसळला; मुदखेड रेल्वे स्थानकातील धक्कादायक प्रकार

- सचिन मोहिते
मुदखेड ( नांदेड):
येथील रेल्वे स्थानकावर आज (गुरुवार) सकाळी एक धक्कादायक घटना घडली. स्थानकाच्या सौंदर्यीकरणासाठी साहित्य वाहून नेणारा ट्रॅक्टर अचानक प्लॅटफॉर्म क्रमांक १ वरून अनियंत्रित होऊन थेट रेल्वे रुळावर कोसळला. सुदैवाने रेल्वे प्रशासनाने प्रसंगावधान राखून त्या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या रेल्वेगाड्या इतर प्लॅटफॉर्मकडे वळविल्याने मोठा अनर्थ टळला.

सध्या मुदखेड रेल्वे स्थानकावर सौंदर्यीकरणाचे काम सुरू आहे. यासाठी आवश्यक साहित्य ट्रॅक्टरद्वारे नियमितपणे ने-आण केले जाते. आज सकाळच्या सुमारास एक ट्रॅक्टर प्लॅटफॉर्म क्रमांक १ वर साहित्य टाकून परत जात असताना चालकाचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर ट्रॉलीसह थेट रुळावर कोसळला. या घटनेने संपूर्ण स्थानक परिसरात गोंधळाची स्थिती निर्माण झाली. ट्रॅक्टर कोसळल्याचा मोठा आवाज ऐकून रेल्वे कर्मचाऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. प्रशासनाने तातडीने कारवाई करत प्लॅटफॉर्म १ वर येणाऱ्या सर्व रेल्वेगाड्यांचे मार्ग बदलले. त्यामुळे कोणतीही जीवितहानी झाली नाही.

या घटनेमुळे काही काळ रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली होती. मात्र, प्रशासनाच्या तात्काळ प्रतिसादामुळे परिस्थिती आटोक्यात आली. रेल्वे प्रशासनाने घटनेच्या चौकशीचे आदेश दिले असून, भविष्यात अशा घटना टळाव्यात यासाठी सुरक्षा उपाय अधिक कडक केले जातील, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Web Title: Shocking! Tractor falls directly from platform onto tracks; Incident at Mudkhed railway station