'स्टोनमन'ची दहशत? नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2026 17:53 IST2026-02-24T17:53:03+5:302026-02-24T17:53:54+5:30

मारेकऱ्याची माहिती द्या, २५ हजार मिळवा! पुण्यातील 'या' व्यक्तीवर पोलिसांचा संशय.

Shadow of 'Stoneman' in Marathwada: Elderly Women Brutally Murdered with Stones in Chhatrapati Sambhajinagar after Nanded; Police on High Alert | 'स्टोनमन'ची दहशत? नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून

'स्टोनमन'ची दहशत? नांदेडपाठोपाठ छत्रपती संभाजीनगरमध्ये वृद्ध महिलेचा दगडाने ठेचून खून

- गोविंद टेकाळे
अर्धापूर (जि. नांदेड) :
राज्यात गेल्या काही दिवसांपासून वृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांच्या डोक्यात दगड घालून हत्या करण्याचे सत्र सुरू आहे. नांदेड जिल्ह्यातील दाभड येथील घटनेला महिना उलटत नाही तोच, छत्रपती संभाजीनगरमध्येही अगदी त्याच पद्धतीने एका ७५ वर्षीय शेतकरी वृद्ध महिलेचा खून करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे. या दोन्ही घटनांमधील साम्य पाहता, हा सिरिअल किलर आहे की विकृत मानसिकतेचा मारेकरी, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

पहिली घटना अर्धापूर तालुक्यातील दाभड येथे २२ जानेवारी रोजी घडली. पार्वतीबाई प्रतापराव सूर्यवंशी (वय ७५ वर्षे ) या वृद्ध महिला नेहमीप्रमाणे शेताकडे जात असताना, अज्ञात इसमाने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांची निर्घृण हत्या केली. दिवसाढवळ्या घडलेल्या या घटनेने संपूर्ण जिल्हा हादरला होता. २१ फेब्रुवारी रोजी छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शेकटा येथे तशाच प्रकारची पुनरावृत्ती झाली. सुंदराबाई नामदेव जाधव (वय ७५ ) या वृद्ध महिला शेतात काम करत असताना त्यांच्यावर पाळत ठेवून अज्ञात आरोपीने त्यांच्या डोक्यात दगड घालून त्यांचा जीव घेतला. हा सर्व प्रकार नांदेडच्या घटनेशी जुळत आहे.

सिरिअल किलर की विकृत मानसिकता?
दाभड येथील महिलेच्या अंगावर दागिने तसेच आहेत, चोरी किंवा दागिन्यांची लूट हा हेतू नसून केवळ हत्या करणे हाच त्याचा आनंद आहे का? तो ७५ वर्षीय वृद्ध महिला निवडतो आणि दगडाने त्यांचा खून करतोय का? विशेषत या दोन्ही घटनांमध्ये पीडित महिलांचे वय समान असून हत्येची पद्धत सारखीच आहे. घटनेचे ठिकाण शेताकडे जाणारा रस्ता, शेताचा परिसर आहे. यामुळे ग्रामीण भागात शेतात एकट्या जाणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. नांदेडच्या घटनेला २५ दिवस उलटूनही आरोपी अद्याप मोकाट असतानाच संभाजीनगरमध्ये ही घटना घडल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. हा एखादा सिरिअल किलर तर नाही ना? याचा तपास करणे आता पोलिसांसमोर आव्हान ठरले आहे.

संशयित आरोपीवर २५ हजारांचे बक्षीस
दाभड (जि. नांदेड) या घटनेतील फरार असलेला संशयित आरोपी संभाजी उर्फ पोपट बबन दगडे (अंदाजे वय ४०, मूळ पत्ता रा. धनगरवाडा धोंडज, ता. पुरंदर, जिल्हा पुणे) असून हा संशयित अर्धापूर परिसरातील एका ढाब्यावर कामाला होता. त्यानेच ही निर्घृण हत्या केल्याचा प्रबळ संशय पोलिस यंत्रणेला आहे. या आरोपीवर २५ हजारांचे बक्षीस ठेवण्यात आले आहे.

२ ते ३ डझन हत्या करणाऱ्या स्टोनमन चर्चेत
साडेतीन दशक वर्षांपूर्वी मुंबई- कोलकत्ता येथे फुटपाथवर झोपलेल्या जवळपास दोन ते तीन डझन लोकांचा निर्दयीपणे २५ ते ३० किलो वजनाचा धोंडा डोक्यात घालून खून करणाऱ्या स्टोनमनच्या घटनेची आठवण ही या घटनेकडे पाहून येते. जनतेमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Web Title : स्टोनमैन का आतंक? छत्रपति संभाजीनगर में भी वृद्ध महिला की हत्या

Web Summary : नांदेड़ के बाद छत्रपति संभाजीनगर में भी 75 वर्षीय महिला की पत्थर से हत्या, सीरियल किलर का डर। दोनों घटनाओं में समानता, पुलिस जांच जारी, लोगों में दहशत का माहौल।

Web Title : Stone-man Panic? Elderly Woman Murdered Similarly in Chhatrapati Sambhajinagar

Web Summary : Following a similar murder in Nanded, a 75-year-old woman was killed in Chhatrapati Sambhajinagar, raising fears of a serial killer. Both victims were elderly women attacked with stones, prompting a police investigation and public concern.