शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नाहीतर सामूहिक मरणाची परवानगी द्या! शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 2, 2026 13:15 IST2026-01-02T13:11:30+5:302026-01-02T13:15:48+5:30
शक्तीपीठ महामार्गात जाणाऱ्या सुपीक जमिनीसाठी नांदेडच्या २०० शेतकऱ्यांची सामूहिक इच्छा मरणाची मागणी

शक्तीपीठ महामार्ग रद्द करा नाहीतर सामूहिक मरणाची परवानगी द्या! शेतकऱ्यांचे रक्ताने पत्र
- शरद वाघमारे
मालेगाव (नांदेड): संपूर्ण जग जेव्हा २०२६ च्या नववर्षाचे स्वागत जल्लोषात करत होते, तेव्हा नांदेड जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने लिहिलेले एक हृदयद्रावक निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना सादर केले. नियोजित शक्तीपीठ महामार्ग कायमचा रद्द करावा, अन्यथा आम्हाला सामूहिक रित्या 'इच्छा मरणाची' परवानगी द्यावी, अशी आर्त साद या निवेदनाद्वारे घालण्यात आली आहे.
बागायती जमिनीवर कुऱ्हाड?
नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर आणि मालेगाव परिसरातील सुपीक बागायती जमीन, जिथली केळी आणि हळद थेट विदेशात निर्यात केली जाते, ती या महामार्गामुळे नष्ट होण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. पूर्ण आणि अप्पर पेनगंगा प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील या जमिनी वाचवण्यासाठी शेतकरी गेल्या पावणेदोन वर्षांपासून निकराचा लढा देत आहेत. प्रशासकीय पथकाची मोजणी रोखून धरल्यानंतर आता शासनाच्या दमनकारी धोरणाला वैतागून शेतकऱ्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले आहे.
कोल्हापूरप्रमाणे आम्हालाही न्याय द्या!
"नुकतेच विधिमंडळात सोलापूर, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गाचे आरेखन बदलण्याचे संकेत सरकारने दिले आहेत. तिथे जर समांतर मार्ग असल्याचे कारण दिले जाते, तर आमच्या भागातूनही अवघ्या ३ ते ८ किमी अंतरावर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ३६१ (नागपूर-रत्नागिरी) अस्तित्वात आहे. मग आमच्याच सुपीक जमिनींचा बळी का घेतला जात आहे?" असा सवाल कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार आणि सतीश कुलकर्णी यांनी उपस्थित केला आहे.
लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा
या निवेदनावर शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीचे समन्वयक सुभाष मोरलवार, सतीश कुलकर्णी, गजानन तीमेवार, प्रमोद इंगोले, कचरू मुधळ यांच्यासह विठ्ठलराव गरुड, पराग अडकिने, प्रदीप गावंडे, ज्ञानोबा हाके, अनिल चव्हाण, बापूराव ढोरे, ईश्वर सवंडकर, दिलीप कराळे, धोंडीराम कल्याणकर, सतीश देसाई, बालाजी इंगोले, सुभाष कदम, तुकाराम खुर्दा मोजे, सोनाजी बुट्टे, माधव इंगोले, शंकर तिमेवार, सुरज मालेवार, आनंदराव नादरे, दिलीप भिसे यांच्यासह २०० हून अधिक बाधित शेतकऱ्यांच्या स्वाक्षऱ्या असून, जर शासनाने यावर तातडीने तोडगा काढला नाही, तर हा लढा अधिक तीव्र करण्याचा इशारा कृती समितीने दिला आहे.